राज्यात २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी प्रचार मंगळवारी संपला. या निवडणुकीतील मुद्दे जनतेशी संबंधित कमी आणि मूलभूत प्रश्नांना बाजूला ठेवणारे अधिक होते. मुंबईच्या निवडणुकीला इतर महापालिकांपेक्षा वेगळे महत्त्व आहे. दोन दशकानंतर दोन भावांचे झालेले मनोमिलन, काँग्रेसचे लंगडे पॅनेल, महायुतीत दुफळी अशा पद्धतीने तिथे निवडणूक होत आहे. मुंबईत प्रत्येक निवडणुकीला मराठी-विरुद्ध अमराठी असा वाद होतच असतो; परंतु या वेळी पाच दशकानंतर त्याला दक्षिण भारतीय विरुद्ध मराठी असा रंग चढला होता.
सहा-सात वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्याने या वेळी त्यात भलतीच रंगत आली. राज्याच्या राजकीय पटलावर सहा वर्षांत दोन आणखी पक्ष स्थापन झाले. शिवसेना, राष्ट्रवादीची शकले झाली. या पार्श्वभूमीवर भाजपच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत. सहा-सात वर्षांपूर्वीही मुंबई, ठाणे, नांदेड, सोलापूर अशा काही महापालिका वगळता उर्वरित महापालिकांवर भाजपचे वर्चस्व होते. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या आमदारांची संख्या सव्वाशेच्या पुढे गेल्याने आता त्यांच्यावर महापालिका ताब्यात घेण्याची जास्त जबाबदारी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्वी पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नव्हत्या. आता त्या पक्षीय चिन्हावर लढवल्या जात असल्याने स्थानिक नेत्यांबरोबरच राज्यस्तरीय नेत्यांचा प्रचारात वावर वाढला होता. एका एका जागेसाठी लढाई सुरू असल्याने साम, दाम, दंड, भेद या सर्व नीतींचा वापर करण्यात आला.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरोग्य, वीज, पाणी, उद्याने, काही पायाभूत सुविधा आदी प्रश्न महत्त्वाचे असतात. त्यावर चर्चा व्हायला हवी; परंतु लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांसारखे मुद्दे प्रचारात आले. केंद्र आणि राज्य सरकारने करावयाच्या कामांची चर्चा महापालिकांच्या निवडणुकीत झाली. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा मुद्दा पुन्हा प्रचारात अग्रस्थानी आला. बाह्यवळण रस्ते, विमानतळ, मेट्रो, बंदरे, उपनगरी सेवा आदी विषय महापालिकांच्या अखत्यारित नसताना तेही प्रचारात आणले गेले. एक वेळ या मुद्यांचे समर्थन करता येईलही; परंतु सत्तेतील तीन पक्षांची अनेक ठिकाणची एकमेकांवरील टीका पाहिली आणि एकमेकांवर हजारो कोटी रुपयांच्या गैरव्यवहारांचे आरोप पाहिले, तर हे सत्तेत मांडीला मांडी लावून बसतात कसे असा प्रश्न कुणालाही पडू शकतो.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर ‘पन्नास खोके, एकदम ओके’ असे आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना करीत होती. आता मुंबईत भाजप आणि शिवसेनेचा शिंदे गट एकत्रित निवडणूक लढवीत असताना एका प्रभागात होत असलेल्या मैत्रीपूर्ण लढतीत भाजपचे कार्यकर्तेच ‘पन्नास खोके, एकदम ओके’ अशा घोषणा देतात. या कार्यकर्त्यांना या घोषणामुळे आपण आपल्याच पक्षाला आमदार विकत घेतल्याच्या आरोपात बसवतो आहोत, हे त्यांच्या लक्षात येत नाही. पुणे, पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या गैरव्यवहाराबद्दल अजित पवार यांनी भाष्य करताच भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना अजित पवार यांना बरोबर घेतल्याचा पश्चाताप होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सिंचन घोटाळ्याची आणि पार्थ पवार यांच्यावरील आरोपाची आठवण करून द्यावी लागते. त्यावरून सत्ताधारी मांडीला मांडी लावून बसताना परस्परांच्या गैरव्यवहाराला संरक्षण देतात आणि एकमेकांची जिरवण्यासाठी तेच मुद्दे पुन्हा पुन्हा काढून जनतेला वेडी ठरवतात, हे पुन्हा अधोरेखित झाले.
राज्यातील अन्य महापालिकांपेक्षा मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय महत्त्वाची. आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत महापालिका असलेल्या या शहरावर आपली सत्ता असावी, असे सर्वंच पक्षांना वाटते. मुंबई महापालिकेवर काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांच्यानंतर तीन दशके शिवसेनेचीचच सत्ता होती. त्यात भाजपही सहभागी होता. आता शिवसेनेच्या कथित गैरव्यवहारावर आरोप करणारा भाजप त्या वेळी त्यांच्या मांडीला मांडी लावून होता. मुंबईतील बहुभाषिक स्वरुप लक्षात घेऊन आणि देशातील सर्वंच भागातील लोक मुंबईत येऊन मतदार झाल्याने त्यांच्या मतांसाठी भाजपने आता देशातील अन्य भागातील नेत्यांना मुंबईत उतरवले आहे. भाजप आणि शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्व समीकरणे तयार केली आहेत. दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक कुरुक्षेत्र आहे आणि विजय प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे.
भाजपला ठाकरे ब्रँड संपवायचा आहे, तर मुंबई महापालिका कोणत्याही परिस्थिती हातातून जाऊ द्यायची नाही, या हेतूने ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यांना त्यांचा शेवटचा बालेकिल्ला वाचवायचा आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नसली, तरी ठाकरे कुटुंबाला कोणत्याही परिस्थितीत आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेवर त्यांचे वर्चस्व टिकवून ठेवायचे आहे. शिंदे सेनेच्या मदतीने भाजप एक नवीन इतिहास लिहू इच्छित आहे.
यामुळे शिंदे सेनेला शिवसेनेच्या वारशाचा खरा उत्तराधिकारी म्हणून उदयास येईल आणि भाजपच्या भविष्याचा मार्गही मोकळा होईल. ठाकरे बंधू मराठी मते एकत्रित करून आपली ताकद तपासत असताना, भाजप उत्तर भारतीय आणि शिंदे सेनेच्या निष्ठावंत मतदारांवर अवलंबून आहे.
भाजपने तमिळ समुदायाला आकर्षित करण्यासाठी मुंबईत तामिळनाडूच्या ‘सिंघम’ अन्नामलाई यांना प्रचारासाठी बोलवले. त्यांनी मुंबईचा उल्लेख बाँबे असा केला, तर मुंबई हे महाराष्ट्राचे शहर नसून आंतरराष्ट्रीय आहे, अशी टीका करून, विरोधकांच्या हाती आयते कोलित दिले. मुंबईत तमिळींची चार टक्के मते आहेत. या सर्वांमध्ये, मुस्लिमांचा मूड निर्णायक भूमिका बजावू शकतो. मुंबई महापालिकेत २२७ प्रभाग आहेत. शहरात मराठी, उत्तर भारतीय, मुस्लिम, गुजराती, मारवाडी असे वेगवेगळे समाजघटक आहेत. मुंबईत मराठी ३० टक्के आहे. शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव-राज यांची आघाडी त्यांच्या पद्धतीने त्यांना आकर्षित करत आहेत. मध्य मुंबई, दादर आणि गिरगावसारख्या भागात मराठी प्रभाव केंद्रित आहे. मराठी भाषिकांचा सुमारे दीडशे जागांवर प्रभाव आहे. उत्तर भारतीय मतदार २५ टक्के असून, भाजप त्यांना आकर्षित करत आहे. हे उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोक आहेत. तिथे भाजप सत्तेत आहे. त्यांचा प्रभाव मालाड, मीरा भाईंदर, कुर्ला आणि गोरेगावसारख्या भागात केंद्रित आहे. त्यांनी पूर्वी भाजप आणि काँग्रेस दोघांनाही मतदान केले आहे. उत्तर भारतीय मतदार पन्नास प्रभागात प्रभावी आहे. या वेळी असंतुष्ट मतदार कोणाला मतदान करतील, हे पाहावे लागेल.
मुंबईत मुस्लिम वीस टक्के आहेत. भेंडी बाजार, कुर्ला आणि मानखुर्द सारख्या भागात या समुदायाचा प्रभाव आहे. या वेळी उद्धव ठाकरे यांनी अनेक मुस्लिम उमेदवार उभे केले आहेत. ओवेसींचा पक्षही निवडणूक लढवत आहे. अशा परिस्थितीत मुस्लिम मतदारांचा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो. गुजराती, मारवाडी मतदारांची संख्या १७ टक्के आहे. हे भाजपचे मतदार मानले जातात. ते बहुतेक व्यापारी समुदाय आहेत. ते मलबार हिल, मुलुंड, घाटकोपर आणि बोरिवली सारख्या भागात राहतात. तमिळी मतदारांची संख्या चार टक्के असून, त्यांना आकर्षित करण्यासाठी भाजप नेते अन्नामलाई यांनी तळ ठोकला, तेव्हा ठाकरे बंधूंनी हल्ला केला. राज यांनी अन्नामलाईंना ‘रसमलाई’ म्हटले. उर्वरित चार टक्के मतदारांमध्ये पंजाबी, दलित आणि ख्रिश्चन मतदारांचा समावेश आहे. वांद्रे आणि विलेपार्ले येथे ख्रिश्चन मतदारांची संख्या लक्षणीय आहे. या एकूण मतपेढीपैकी अंदाजे ८ टक्के मतदार असे मानले जातात, ज्यांनी पारंपारिकपणे कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही. भाजपला आशा आहे, की आठ टक्के ‘फ्लोटिंग व्होटर’ उत्तर भारतीय आणि शिंदे सेनेच्या मुस्लिम-मराठी युतीसह एकत्रित केल्यास महापालिका निवडणूक सहज जिंकतील.
मराठी माणसाच्या हिताची भाषा बोलणारे ठाकरे बंधू आशा करतात, की जर मुस्लिमांनी मराठी मतपेढीशी हातमिळवणी केली तर ते त्यांचा गड टिकवून ठेवू शकतील. संपूर्ण राज्यात मुस्लिम मतदारांची संख्या सुमारे १२ टक्के असली, तरी मुंबईत ती सुमारे २० टक्के आहे. अनेक भागात मुस्लिम समुदाय मुंबई महापालिकेच्या जागांवर निर्णायक ठरतो. २२७ जागांपैकी ४५-५० जागांवर मुस्लिम मते महत्त्वाची असतात. दोन डझनहून अधिक जागा अशा आहेत, जिथे ते निर्णायक भूमिका बजावतात. तथापि, मुस्लिम मतदार एकजूट नाहीत. अर्ध्याहून अधिक उत्तर भारतीय आहेत, तर ३० टक्के मराठी, दक्षिण भारतीय, गुजराती इत्यादी आहेत. मुंबईतील मुस्लिम मराठी आणि बिगर-मराठी अशा दोन गटात विभागले गेले आहेत. अशा परिस्थितीत, मराठी मुस्लिम शिवसेना, बिगर-मराठी मुस्लिम काँग्रेस तसेच इतर पक्षांना मतदान करतात. या वेळी समाजवादी पक्ष आणि ओवेसी यांचा पक्षदेखील मतांचे विभाजन करतील. ते भाजपच्या पथ्थ्यावर पडणारे असेल. काँग्रेस आणि अजित पवार यांनाही मुस्लिम मतदारांकडून मोठ्या आशा आहेत. काँग्रेसदेखील स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. त्यामुळे मुस्लिम मतदार गोंधळात पडू शकतात. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांचा कौल कुणाला हे समजण्यासाठी आणखी दोन दिवस वाट पाहावी लागेल.
– भागा वरखडे
