कृषी आयुक्तांच्या पदनामाचा गैरवापर पुण्यात उघड, मंत्र्यांच्या भेटीमुळे राज्य सरकारही चौकशीच्या फेऱ्यात!

Misuse of Designation of Agriculture Commissioner Exposed
कृषी आयुक्तांच्या पदनामाचा गैरवापर;

Misuse of Designation of Agriculture Commissioner Exposed: राज्याच्या कृषी आयुक्तांच्या पदनामाचा गैरवापर केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातील हडपसर येथील ‘समर्थ क्रॉप केअर’ या कंपनीच्या संचालकाने आपल्या नावापुढे ‘कृषी आयुक्त’ असे पदनाम लावल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे आणि त्यांच्या पथकाने संबंधित कार्यालयाला भेट देऊन हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी याच कंपनीला भेट दिल्याचे समोर आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. कृषी आयुक्तांच्या पदनामाचा गैरवापर करून तसेच मंत्र्यांच्या नावाला पुढे करून राज्य सरकारची फसवणूक झाली आहे का, याचीही आता सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘समर्थ क्रॉप केअर’ कंपनीचा संचालक प्रशांत अनिल गवळी याने आपल्या नावापुढे ‘कृषी आयुक्त’ (PRASHANT ANIL GAWALAGRICULTURECOMMISSIONER) असा फलक कार्यालयाबाहेर लावला होता. राज्याच्या कृषी आयुक्तांशिवाय अन्य कोणीही या पदनामाचा वापर करणे कायद्याचा भंग आहे. ही बाब निदर्शनास येताच, कृषी आयुक्त सूरज मांढरे यांना माहिती देण्यात आली. मांढरे यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी करून तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

पडताळणीत असे समोर आले की, प्रशांत गवळी याने आपल्या नावासमोर ‘कृषी आयुक्त’ असे लावले होते आणि तो फलक कार्यालयाबाहेर स्पष्टपणे दिसत होता. केवळ ‘कृषी आयुक्त’ नावावर अतिशय बारीक अक्षरात ‘सन्माननीय’ असे लिहिलेले होते, अशी माहिती काचोळे यांनी दिली.

या पडताळणीतच गवळीने कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना आपल्या कार्यालयात बोलावल्याचेही स्पष्ट झाले. कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी याबाबत म्हटले आहे की, “पथकाच्या चौकशीत पदनामाचा गैरवापर केल्याचे आढळले आहे. त्यानुसार पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली आहे. अधिक चौकशी करण्याचेही पोलिसांना सांगितले आहे.” या प्रकरणामुळे कृषी विभागात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे