नवी दिल्ली, २५ ऑगस्ट २०२२: बुधवारी आम आदमी पार्टीच्या आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर जोरदार आरोप केले होते. आपचे नेते संजय सिंह यांनी दिल्लीत ऑपरेशन लोटसचा आरोप करत, आपच्या आमदरांना भाजपाकडून पैशांचे प्रलोभन दाखवण्यात येतअसल्याचा, खळबळजनक आरोप सिंह यांनी केला आणि दुसऱ्याच दिवशी पक्षाने बोलावलेल्या बैठकीला आमदार गैरहजर राहिले. त्यामुळे पक्षाने केलेल्या आरोपांना पुष्टी मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या निवासस्थानी, आज आम आदमी पार्टीच्या आमदारांची बैठक बोलावली होती.मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीला पक्षाचे आठ आमदार गैरहजर राहिले आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा या आठही आमदारांशी संपर्क होत नसल्याचे सांगण्यात आले. आपचे आमदार दिलीप पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार काल संध्याकाळपासूनच काही आमदारांशी संपर्क होत नाही. या सगळ्यांशी संपर्क साधण्याचा व बोलण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहे.
भाजपाकडून ऑपरेशन लोटस घडवुन आणून आपचे ४० आमदार फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पक्ष सोडणाऱ्या आमदाराला पक्ष सोडल्यास, प्रत्येक एका आमदारास वीस कोटी रुपयांचे प्रलोभन देण्यात आले आहे आणि दुसऱ्याला बरोबर आणल्यास पंचवीस कोटी रुपये देण्याचे सांगण्यात येत आहे. आपचे आमदार संजीव झा, सोमनाथ भारती, कुलदीप कुमार आणि आणखी एका आमदाराला आप पक्ष सोडण्यासाठी २० कोटी रुपयांचे प्रलोभन दिल्याची माहिती आपचे नेते संजय सिंह यांनी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी– अनिल खळदकर