अमरावती, १३ जुलै २०२३ : मी मंत्रिपदावर आजच दावा सोडणार होतो. पत्रकार परिषदेत ते जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. पण गेल्या अर्धा तासात मुख्यमंत्र्यांचे अनेक फोन आले. त्यांनी मला दावा न सोडण्याची विनंती केली. मला भेट, आपण चर्चा करू. त्यानंतर तू निर्णय घे, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी फार आग्रह केल्यामुळे मी आज मंत्रिपद सोडण्याचा दावा मागे घेत आहे, परंतु १७ तारखेला मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर १८ तारखेला मी माझी भूमिका जाहीर करीन असे प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.
मी रात्री इतनी शक्ती हमे देना दाता हे गाणे ऐकत होतो. त्यामुळे माझे मत परिवर्तन झाले आहे. आपण सामान्यांसाठी राहिले पाहिजे. काही चुका आमच्या हातून झाल्या असतील तर त्या दुरुस्त केल्या पाहिजे. त्याची काळजी घेतली पाहिजे. मला दिव्यांगासाठी,माजी सैनिकांसाठी, घरेलू कामगारांसाठी वेळ द्यायचा आहे. मंत्रिपद घेतल्यावर मला काम करता येणार नाही. पद माझ्यासाठी क्षुल्लक आहे. मला पदाची लालसा नाही. मुख्यमंत्री पेचात आहेत. कुणाकुणाला मंत्रीपद देणार? अशावेळी त्यांना मार्ग काढण्यासाठी मदत केली पाहिजे. त्यामुळे मी मंत्रिपदावरचा दावा सोडला आहे, मी शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदही घेणार नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले.
ही युती अनैसर्गिक आहे परंतु संविधानिक पद्धतीने सर्व घडले पाहिजे.एकंदरीत सत्ता, पैसा आणि पुन्हा सत्ता हे बदलते राजकारण आहे. त्याचा कंटाळा आला आहे.लोक विचित्रपणे प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. हे थांबले पाहिजे. सर्व काही पदासाठी नसते. लोक म्हणतात, आता तुम्हाला पद मिळणार नाही. ५० खोके घेतले, असे म्हणतात. काही प्रामाणिकपणे प्रतिक्रिया देतात तर काही पैसे घेऊन कमेंट करत आहे,असे ते म्हणाले.
एकनाथ शिंदे हे मला महाविकास आघाडीचे सरकार येण्यापूर्वी उद्धव ठाकरेंकडे घेऊन गेले होते. उद्धव ठाकरेंनी पाठिंबा द्या म्हणून सांगितले होते. आपले सरकार बनत आहे,आम्हाला पाठिंबा द्या, असे उद्धव ठाकरेंनी स्वत: फोन करून म्हटले होते. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे गेलो. शिंदे सोबत होते. आम्ही पाठिंबा दिला. त्यानंतर विरोधकांकडून आम्हाला अमिष आली, आम्हीही मंत्रिपद देऊ, आमच्यासोबत या असे विरोधक म्हणाले. पण आम्ही पाठिंब्यावर ठाम राहिलो. उद्धव ठाकरे शब्दावर ठाम राहिले. त्यांनी राज्यमंत्रिपद दिले.
मी गेल्या वीस पंचवीस वर्षापासून दिव्यांगांसाठी काम करतो. दिव्यांग मंत्रिपद तयार करावी अशी मागणी मी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. पण ते खाते तयार झाले नाही. ते झाले असते तर गुवाहाटिला जायची वेळ आली नसती. शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांनी दिव्यांग मंत्रिपद तयार केले. माझ्या बंडामुळे आणि आंदोलानामुळे हे खाते तयार झाले. शिंदेंचे माझ्यावर जन्मभर ऋण राहतील. त्यांचा व्यक्तिगत गुलामही बनेल. त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहे, असेही बच्चू कडू म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर