हिंगोली, २६ एप्रिल २०२१: सध्या देशभरात कोव्हिड १९ महामारीमुळं ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचा मृत्यू होतय. महत्त्वाचं म्हणजे राज्यात याचा सर्वाधिक फटका बसला आहे. राज्य सरकार परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न देखील करत आहे. ऑक्सीजन बरोबरच रेमडेसिवीर इंजेक्शनचा ही मोठा तुटवडा राज्यात पहायला मिळत आहे. यातून हिंगोली जिल्हा ही सुटलेला नाही. मात्र, जिल्ह्यातून एक चांगली बातमी समोर येत आहे. या भयान परिस्थितीत रुग्णांना रेमडेसिवीर उपलब्ध व्हावा यासाठी कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी स्वत:ची एफडी मोडून उपाययोजना करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आलीय.
संतोष बांगर यांनी स्वतःची एफडी मोडून जिल्ह्यात तब्बल ५ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देणार आहे. ही एफडी मोडून त्यांनी ९० लाख रुपये दिले आहेत. हिंगोलीत दिवसभरात तब्बल दहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर ९० जणांना कोरोनाची लागण झाली. हिंगोलीतील कोरोनाबाधितांचा आकडा ११ हजार ६८५ वर पोहोचलाय. अश्या परिस्थितीत बांगर यांच्या या प्रयत्नामुळं हिंगोली जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना निश्चितच दिलासा मिळणार आहे.
“जिल्हाधिकारी आणि मेडिकल असोसिएशन यांच्यात ज्यावेळी बैठक झाली त्यावेळी १० हजार इंजेक्शन दिलं जाईल, असा निर्णय झाला. त्यापैकी ५ हजार इंजेक्शन हे सरकारी रुग्णालयासाठी तर ५ हजार इंजेक्शन हे खासगी रुग्णालयांसाठी दिले जातील, असं ठरवण्यात आलं. त्यावेळी मेडिकल असोसिएशनमधील वितरक सदस्यांपुढं मोठा प्रश्न निर्माण झाला. इंजेक्शनसाठी १ कोटी ४० लाख रुपयांचा आरटीजीएस करायचा होता. ही रक्कम कुठून द्यायची? असा प्रश्न मेडिकल मालकांपुढं उभा राहीला”, असं संतोष बांगर यांनी सांगितलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे