माढा, १४ सप्टेंबर २०२०: विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश चाचणी (NEET) परीक्षा, २०२० जिल्ह्यांतील विविध केंद्रांवर रविवार दि. १३ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. या परीक्षा केंद्राच्या नावाच्या गैरसमजातून एका विद्यार्थिनीची व तिच्या पालकांची चाललेली धावपळ व अस्वस्थता ओळखून संवेदनशील शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी समयसूचकता व माणूसकी दाखवत त्या परीक्षार्थी विद्यार्थिनीला तिच्या पालकांसह स्वत:च्या गाडीत बसवून अत्यंत कमी वेळात सिंहगड इंजिनियरिंग कॉलेज केगाव – सोलापूर येथून पंढरपूरच्या सिंहगड इंजिनियरिंग कॉलेज या परीक्षा केंद्रावर दाखल केले.
याबाबतचे वृत्त असे की, रविवारी देशभरात राष्ट्रीय पातळीवरील “नीट” परीक्षा घेण्यात आली. सोलापूर येथील दयानंद कॉलेजची विद्यार्थिनी कु. स्नेहा माधव धुत्तरगी व तिचे वडील सिंहगड इंजिनियरिंग कॉलेज केगाव – सोलापूर येथे परीक्षेसाठी पोहोचले. पण या सिंहगड ऐवजी पंढरपूरच्या सिंहगड इंजिनियरिंग कॉलेजला परीक्षा केंद्र आहे, हे लक्षात आल्यावर ते केगावच्या कॉलेजच्या प्रवेशद्वारासमोर विद्यापीठाजवळ हतलब होवून खाजगी वाहन भाड्याने मिळेल का? याची शोधाशोध करीत होते. दरम्यानच्या वेळी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत हे बाळे येथील माध्यमिक शिक्षक व सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदाचा निवडणूक कार्यक्रम आटोपून खाजगी कामानिमित्त सिंहगड काॅलेज केगाव परिसरात आले असताना विद्यापीठासमोर गाडी आल्यावर त्या विद्यार्थिनी व पालकांची हतबलता व धावपळ पाहून आमदारांनी समयसूचकता दाखवली. त्यांनी त्वरित गाडी थांबवली व चौकशी केली. त्यावर त्यांना संपूर्ण बाब लक्षात आली.
यावर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मुलीला व तिच्या वडिलांना धीर देत स्वतःचे नियोजित काम बाजूला ठेवून, “काळजी करू नका, मी तुम्हाला कोर्टी- पंढरपूरच्या सिंहगड इंजिनियरिंग कॉलेजमध्ये सोडतो” असे सांगून स्वत:च्या गाडीत बसविले. पालकांना गाडी मिळाल्याचे समाधान झाले. ते गाडीत बसले, भाडे किती द्यायचे? अशी विचारणा चालकास केल्यानंतर गाडीच्या चालकांनी हे आमदार दत्तात्रय सावंत सर आहेत असे सांगितले. तेव्हा त्या विद्यार्थिनीचे व पालकांचे डोळे पाणावले.
वेळ अगदीच कमी शिल्लक असताना प्रसंगावधान ओळखून शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी माणुसकीचे दर्शन घडवत सिंहगड इंजिनियरिंग कॉलेज कोर्टी पंढरपूर येथील परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ स्वत: जाऊन त्या विद्यार्थीनीला वेळेत परीक्षेला पाठविले.
तेव्हा पालक डाॅ. महादेव धुत्तरगी, रा. श्रीशैल नगर, सोलापूर यांनी आमदार सावंत सरांनी दाखविलेली माणुसकी, समयसूचकता व संकटकाळी मदतीला धावून आल्याबद्दल नम्रपणे कृतज्ञता व्यक्त करून, केवळ तुमच्यामुळेच माझ्या मुलीला परीक्षेला बसता आले अशी भावना व्यक्त केली.
यावेळी पतसंस्थेचे माजी चेअरमन शंकर वडणे, कृती समितीचे राज्य संघटक समाधान घाडगे, माजी चेअरमन श्रीधर उन्हाळे, नागनाथ राऊत, चनबसप्पा बिराजदार आदी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील