अंबाजोगाई, २२ ऑक्टोबर २०२०: अंबाजोगाईच्या तहसील कार्यालयात अंबाजोगाई व केज येथील तालुका क्रिडा संकुल समितीची बैठक आज दिनांक २२ ऑक्टोबर रोजी आमदार नमिता मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
क्रिडा संकुलनाच्या इमारतीची तसेच परिसराची आ. नमिता मुंदडा यांनी पाहणी केल्यानंतर, क्रिडा संकुलनातील बॅडमिंटन हॉल व कार्यालयीन बांधकामात अनेक उणिवा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बांधकामातील या उणिवा व त्रुटी दूर करूनच क्रिडा संकुलाचे हस्तांतरण व्हावे, अशा सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या. तसेच, कंत्राटदारांच्या माध्यमातून या उणिवा तत्काळ दूर करून क्रिडा संकुल खेळाडूंसाठी लवकर उपलब्ध करून द्यावे. क्रिडा संकुलाच्या उर्वरित कामासाठी आपण निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन देखील त्यांनी दिले.
केजच्या क्रिडा संकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देखील आमदार नमिता मुंदडा यांनी आज या बैठकीत दिले. केज येथे नव्याने प्रस्तावित असलेल्या क्रिडा संकुलाचे काम जागे अभावी रखडले आहे. तरी, आजच्या झालेल्या बैठकीत जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार यांनी चार जागेचे प्रस्ताव अधिकाऱ्यांसमोर ठेवले. तरी, या परिसराची अधिकाऱ्यांनी पाहणी करून क्रिडा संकुलासाठी उचित ठरणारी जागा प्रस्तावित करण्याचे त्यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रगती कराड