कर्जत, १ ऑगस्ट २०२० : कोरोनाच्या संकट समयी आपल्या ऍम्ब्युलन्स द्वारे तालुक्याला अत्यंत चांगली सेवा देणाऱ्या अफसर पठाण व त्यांचा मुलगा मेहराज पठाण यांचे आज उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे कौतुक करत त्याच्या सह त्याच्या अम्ब्युलन्स पुढे उभे राहून खास फोटो काढला.
आमदार रोहित पवार यांनी कोरोना संदर्भात आढावा घेण्यासाठी आज कर्जत जिल्हा उप रुग्णालयास भेट दिली, यावेळी कोरोनाबाबतची विविध प्रकारची माहिती घेत असताना कोरोनाच्या रुग्णांना नगर येथे पोहोचविण्यासह इतर आरोग्य सुविधांसाठी खाजगी ऍम्ब्युलन्स द्वारे कर्जत शहरातील अफसर भाई आणि मेहराज पठाण हे कोरोनाच्या काळातही चांगले काम करत असल्याबद्दल आमदार रोहित पवार यांना माहिती मिळताच त्यांनी या पिता पुत्रांच भेट घेतली व त्यांच्या अम्ब्युलन्स पुढे उभे राहून खास फोटोही काढला.
कर्जत तालुक्यात ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध नसताना अफसर पठाण यांनी आपल्या वाहनाद्वारे रुग्णसेवा करण्यास सुरुवात केली. पुढे त्यांनी ऍम्ब्युलन्स घेऊन आपला वसा सुरूच ठेवला तालुक्यातील अपघात असो वा आत्महत्या, इमर्जन्सी रुग्णांना पोहचवणे असो किंवा कोणत्याही कामासाठी अफसर पठाण यांनी पोलिसांसह आरोग्य विभागाला सतत मदत करत आपले कार्य चालूच ठेवले. त्यांच्या या कार्यात मुलगा मेहराज पठाण यांनेही सहभाग नोंदवत ऍम्ब्युलन्स सेवा देणे, आरोग्य विभाग, पोलीस यांना आवश्यक त्या ठिकाणी मदत करणे आदी कामे सुरूच ठेवली असून कर्जत तालुक्यात खाजगी ॲम्बुलन्ससाठी हे पितापुत्र विशेष परिचित असून आपल्या मधाळ वाणीने सर्वांना आपलेसे करत आहेत.
सध्या कोरोनाचे संकट वाढले असतानाही हे दोघेही ही आपला जीव धोक्यात घालून आरोग्य विभागाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असून त्यांचा आमदार रोहित पवार यांनी आज गौरवच केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष