पुणे, १६ जुलै २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीतून बंड केले. यानंतर अजित पवार भाजप-शिवसेना युतीसोबत आले आणि राज्यातील सत्तेत सहभागी झाले. अजित पवार यांच्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे शरद पवार गटासोबत असणाऱ्या आमदारांची संख्या कमी झाली आहे. आतापर्यंत सर्वाधिक संख्याबळामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद होते. ते आता काँग्रेसकडे जाणार आहे.
पुणे जिल्ह्यातील भोर-वेल्हा विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी जोर लावला आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिल्याची चर्चा होती. मात्र ही चर्चा संग्राम थोपटे यांनी फेटाळून लावली आहे. आपण कुठल्याही प्रकारचे पत्र पक्षश्रेष्ठींना लिहिलेले नाही, असा दावा त्यांनी केला.
आमदार संग्राम थोपटे म्हणाले की, विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळणार आहे. परंतु मी या क्षणापर्यंत पद मागण्यासाठी कुठलेही पत्र लिहिलेले नाही, पण पक्षाने माझ्या कामाचा विचार करुन मला हे पद दिले, तर मी विरोधी पक्ष नेता होईल. काँग्रेसचे आमदार फुटणार नाहीत, यात तीळमात्र शंका नाही, असा दावा त्यांनी केला. कुणाच्या मनात काय आहे, हे आपण ओळखू शकत नाही, मात्र आज तरी काँग्रेसचा कुठलाही आमदार, लोकप्रतिनिधी दुसऱ्या विचारधारेला स्वीकारणार नाही, असा दावा थोपटे यांनी केला.
अधिवेशात आम्ही नेहमी प्रश्न मांडत असतो. आताही विकाससंदर्भातील प्रश्न मांडण्यात येतील. जनतेच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांवर जाब विचारला जाणार असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले आहे. राज्याचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून सुरु होत आहे. दोन आठवडे हे अधिवेशन चालणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर हे पहिलेच अधिवेशन आहे. त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांना कसे कोंडीत पकडतात? याकडे लक्ष लागले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर