आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका!

15

मुंबई, १८ ऑक्टोबर २०२२: शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. शिरसाट यांना सोमवारी दुपारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर त्यांच्यावर औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात तातडीने उपचार करण्यात आले. मात्र, त्यानंतरही संजय शिरसाट यांच्या प्रकृतीत सुधारण होत नसल्याने आता त्यांना उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले आहे.

एअर अ‍ॅम्ब्युलन्सने तातडीने मुंबईला रवाना

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून संजय शिरसाट यांची प्रकृती बिघडली होती. काल दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावली. सध्या संजय शिरसाट यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून संजय शिरसाट यांना उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले.

औरंगाबाद विमानतळावरून मंगळवारी सकाळी संजय शिरसाट एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात संजय शिरसाट यांच्या भेटीसाठी रुग्णालयात जाणार आहेत.

कोण आहेत संजय शिरसाट ?

संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम येथील आमदार आहेत. राज्यात झालेल्या सत्तांतरात शिरसाटदेखील सामील होते. शिवसेनेचे उमेदवार म्हणून सलग तीन वेळेस विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडात त्यांचा सहभाग होता. त्यांच्या बरोबर गेलेल्या चाळीस आमदारांपैकी संजय शिरसाट आहेत. शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर संजय शिरसाट यांनी शिवसेना नेतृत्वावर विशेषत: खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा