मनसेचा ठाणे आणि पालघरवर लोकसभेवर डोळा, भाजप-शिंदे गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

ठाणे, १८ ऑगस्ट २०२३ : लोकसभा निवडणूक अवघ्या आठ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. ठाकरे गटाच्या मातोश्रीवर लोकसभा निवडणुकीसाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभांच्या माध्यमातून वातावरण निर्मितीवर भर दिला आहे. तर भाजप,शिंदे आणि अजितदादा गटानेही सभांवर भर दिला आहे. आता यात मनसेनेही कंबर कसली आहे. मनसेने लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली असुन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन आणि सूचना करण्यात येत आहेत.

मनसेने मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे शिंदे गटा बरोबर भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीवर भाष्य केले.आगामी लोकसभा निवडणुका संदर्भात चर्चा झाली. कार्यकर्त्यांनी काय करावे? पदाधिकाऱ्यांनी काय करावे या संदर्भात देखील चर्चा झाली आहे. पुढच्या सहा महिन्यात घराघरांमध्ये महाराष्ट्र सैनिक पोहोचणार आहे, असे अविनाश जाधव यांनी सांगितले.

आम्ही पालघर आणि ठाणे जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या दोन्ही जिल्ह्यातील लोकसभेच्या चारही जागा आम्ही लढवणार आहोत. तुल्यबळ उमेदवार देणार आहोत. आमची लढाई ही जिंकण्यासाठीच असेल, असे जाधव यांनी सांगितले. मनसेच्या या भूमिकेमुळे शिंदे गट आणि भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे, ठाकरे गटाचे राजन विचारे आणि भाजपचे कपिल पाटील हे खासदार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा