मनसे सरचिटणीस संदीप देशपांडेंसह तीन नेत्यांना अटक

मुंबई, २२ सप्टेंबर २०२०: मुंबईमध्ये सर्वसामान्यांसाठी पुन्हा एकदा लोकल सुरू व्हावी यासाठी मनसेनं सोमवारी वेगवेगळ्या स्थानकांमध्ये सविनय कायदेभंग आंदोलन केलं. या आंदोलनात मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काही सहकार्‍यांसह लोकलनं कोणत्याही परवानगीविना प्रवास केला. त्यामुळं त्यांच्यावर कर्जत लोहमार्ग पोलिसांनी वेगवेगळ्या कलमानुसार गुन्हा दाखल केलाय. आता या गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक करण्यात आलीय.

काल सकाळी शेलू ते कर्जत मार्गावर प्रवास केल्याप्रकरणी कर्जत लोहमार्ग पोलिसांनी संदीप देशपांडे यांच्यासह गजानन काळे, संतोष धुरी, अतुल भगत या तिघांनाही अटक केली आहे. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन, विना तिकीट प्रवास तसंच रेल्वे अधिनियम कलम १४७, १५३, १५६ अन्वये कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

काय आहे प्रकरण

मुंबई लोकल सुरु करा या मागणीसाठी मनसे काल रस्त्यावर उतरली होती. यावेळी मनसेकडून सविनय कायदेभंग करत विनापरवाना लोकलमधून प्रवास करण्यात आला. यावेळी रेल्वे पोलिसांना गुंगारा देत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी लोकलमधून प्रवास केला होता. तसेच संतोष धुरी, गजानन काळे, अतुल भगत या मनसे नेत्यांनीही रेल्वे प्रवास केला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा