डोंबिवली, २६ ऑगस्ट २०२०: कल्याण डोंबिवलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांना त्यांच्याच घरच्या रस्त्यासमोरील खड्डे दाखवले आहेत. राजकारण करण्यापेक्षा नागरिकांच्या हिताची कामे करूया असा टोला देखील या वेळेस त्यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्रीजी ठाण्यात येणार म्हणून त्यांच्या मार्गातील रस्ते खड्डे मुक्त केले. माझी विनंती आहे की आपण डोंबिवलीत पण सहज एक फेरफटका मारावा, किमान कल्याण-शीळ रोडवरचे खड्डे तरी भरले जातील. पाहिजे तर मी स्वत: शिळफाट्यावर स्वागतासाठी उभा राहतो असे विधान मनसे आमदार राजू पाटील यांनी केले होते.
त्यावर शिवसेनेने प्रतिउत्तर सुद्धा दिले. शिवसेनेचे खासदार आणि नेते श्रीकांत शिंदे म्हणाले की, ट्विटरवर मागणी आणि ट्विटरवर फॉलोअप घेणाऱ्या आमदारांनी प्रत्यक्षात कल्याण शीळ रोडवर फेरफटका मारावा, जेणेकरुन कल्याण शीळ रोडवर कुठे काम सुरु आहे हे कळेल, असं प्रत्युत्तर श्रीकांत शिंदे यांनी राजू पाटील यांना दिले होते.
याच प्रत्युत्तरावर आज राजू पाटील यांनी थेट श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यासमोरच जाऊन रस्यावर असलेला खड्डा दाखवला. तुम्ही इथे राहत नसलात तरी देखील मी याच मतदार संघात राहतो. त्यामुळे मला या परिसरातील सर्व गोष्टी माहित आहेत असे वक्तव्य आमदारांनी केलं आहे. यामुळे एकमेकांवर टिका करण्याऐवजी नागरिकांच्या हिताची कामं करूया असा टोला देखील त्यांनी लगावला आहे .
न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे