मनसेचे बारामती शहर पोलीस निरीक्षकांना निवेदन

बारामती, १५ जुलै २०२० : पुण्यात दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेने इसीस संबंधित एका संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून दोघांना अटक केली आहे.या आरोपींपैकी एक महिला आरोपी ही बारामती मध्ये एका महाविद्यालयात पत्रकारितेचे शिक्षण घेत असल्याची माहिती समोर येत आहे. तरी बाहेर गावाहून शिक्षणासाठी, कामासाठी, व्यवसायासाठी येणाऱ्या लोकांची माहिती स्थानिक पोलिसांकडे देणे बंधनकारक करावे असे मनसेच्या वतीने मागणीचे निवेदन आज देण्यात आले आहे.

पुण्यात राष्ट्रीय तापास यंत्रणेने केलेल्या कारवाईतील आरोपींवर राष्ट्रीय तपास यंत्रणा व इतर सक्षम यंत्रणा हे योग्य तो तपास व कार्यवाही करतील, मात्र, या निमित्ताने एक नेहमी दुर्लक्षित राहणारा पण महत्वाचा मुद्दा समोर येतो. शहरातील घर भाड्याने देणाऱ्या घरमालकांना त्यांच्याकडे राहणाऱ्या भाडेकरूंची संपुर्ण माहिती ही स्थानिक पोलिसांना कळवणे कायद्याने बंधनकारक आहे.मात्र कोठेही याचे पालन होताना दिसत नाही.

मागील २-३ वर्षांपूर्वी बारामती शहर व ग्रामीण परिसरात अवैधरीत्या वास्तव्य करणारे काही बांगलादेशी नागरिक सापडले होते, त्यावेळी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं.
बऱ्याच वेळा परप्रांतातून येणारे लोकं बारामती परिसरात भाडेकरू म्हणून राहतात, मात्र त्यांचे घरमालक स्थानिक पोलिसांना त्यांची माहिती देत नाहीत.त्यांची खरी माहिती जर पोलिसांकडे असेल तर अशा प्रकारचे गुन्हे व बेकायदेशीर कृत्य उघडकीस होण्यास मदत होईल.

बारामती मध्ये परराज्यातील अनेक विद्यार्थी, कामगार वास्तव्यास आहेत. त्यांची माहिती स्थानिक पोलिसांकडे असणे आवश्यक आहे.याबाबत आज बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष निलेश वाबळे, भार्गव पाटसकर, प्रविण धनराळे उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा