नवी दिल्ली, दि. २८ मे २०२०: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्याशी दूरध्वनी वरून संवाद साधताना श्रीलंकेच्या संसदेत त्यांना ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी राजपक्षे यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत श्रीलंकेच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचा पुनरुच्चार करत त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
श्रीलंकेतील भारतीय वंशाचे तामिळ ज्येष्ठ नेते अरुमुगन थोंडमन यांच्या अचानक आणि अकाली झालेल्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील विकास भागीदारी पुढे नेण्यासाठी थोंडामन यांनी घेतलेल्या भूमिकेची पंतप्रधानांनी आठवण काढली.
उभय नेत्यांनी सध्या सुरु असलेल्या कोविड-१९ साथीच्या आजाराचा आरोग्यावर आणि अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांवर आणि त्याचा सामना करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये घेत असलेल्या उपायांवर चर्चा केली. या आव्हानात्मक काळात भारत श्रीलंकेला सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी तयार असल्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी श्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांना दिले.
न्यूज अनकट प्रतिनिधी