मोदी सरकारच्या कर महसुलात 74% वाढ, इतके लाख कोटी रुपये जमा झाले

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2021: कोरोना संकट असूनही, या वर्षी केंद्र सरकारच्या कर संकलनात मोठी वाढ झालीय. या आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 22 सप्टेंबर दरम्यान निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 74.4 टक्क्यांनी वाढलं आहे. कोरोनापूर्व काळात म्हणजेच 2019-20 मध्ये याच कालावधीत निव्वळ कर संकलनापेक्षा हे अधिक आहे.

वित्त मंत्रालयानं शुक्रवारी सांगितलं की, 1 एप्रिल ते 22 सप्टेंबर या आर्थिक वर्ष 2021-22 दरम्यान सरकारचं निव्वळ कर संकलन 5.70 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. यामध्ये कॉर्पोरेट टॅक्स अर्थात कंपनी कर 3.02 लाख कोटी रुपये आणि इनकम टैक्स (वैयक्तिक आयकर) 2.67 लाख कोटी रुपये समाविष्ट आहे.

आर्थिक वर्ष 2021-22 च्या 1 एप्रिल ते 22 सप्टेंबर दरम्यान सकल कर संकलन (ग्रॉस) 47 टक्क्यांनी वाढून 6.45 लाख कोटी रुपयांहून अधिक झाले. सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कर परताव्याच्या (टॅक्स रिफंड) समायोजनानंतर नेट टॅक्स, म्हणजे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 5,70,568 कोटी रुपये होते. गेल्या आर्थिक वर्ष 2020-21 (एप्रिल -22 सप्टेंबर) मध्ये याच कालावधीत निव्वळ कर संकलन 3.27 लाख कोटी रुपये होते.

कोरोना पूर्वीपेक्षा जास्त

विशेष गोष्ट अशी आहे की हा संग्रह कोरोनापूर्व काळात म्हणजेच 2019-20 मध्ये याच कालावधीत 4.48 लाख कोटींच्या निव्वळ कर संकलनापेक्षा 27 टक्के अधिक आहे. कर संकलनात झालेली वाढ ही सरकारसाठी मोठी दिलासा देणारी बाब आहे कारण कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या देशात कल्याणकारी योजना आणि लसीकरणासाठी सतत खर्च करण्याची गरज आहे.

उद्दिष्टाच्या 58% पर्यंत कर्ज घेतले

या दरम्यान, सरकारनं चांगले कर्जही घेतले आहे. वृत्तसंस्था पीटीआय नुसार, सरकारनं आतापर्यंत अर्थसंकल्पित रकमेच्या 58 टक्के पर्यंत कर्ज घेतलं आहे. सरकारनं बाजारात 7.02 लाख कोटी रुपयांची डेट सिक्योरिटी जारी करून पैसे उभे केले आहेत. या संपूर्ण आर्थिक वर्षात सुमारे 12.05 लाख कोटी रुपये कर्ज घेण्याचे लक्ष्य आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा