नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (ता.२) मोठी घोषणा केली आहे. येत्या रविवारी सोशल मीडियाचा वापर बंद करणार आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या साऱ्या सोशल मीडियावरून प्लॅटफार्मवरून एक्झिट घेण्याचा त्यांचा विचार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सोशल मीडिया प्रेम तर सगळ्यांनाच आता ठावूक झालंय. आत्तापर्यंत आपल्या अनेक घोषणा सोशल मीडियाद्वारेच करणाऱ्या पंतप्रधान मोदींचा ‘सोशल मीडिया मोहभंग’ झालाच कसा? हा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना भंडावून सोडतोय. त्यामुळेच पंतप्रधानांच्या ट्विटनंतर थोड्याच वेळात ‘नो सर’ ट्रेन्ड करायला लागलं.
मंगळवारी सकाळीही हा टॉप ट्रेन्ड होता. हा हॅशटॅग वापरून चाहते पंतप्रधानांना सोशल मीडियातून बाहेर न पडण्याची विनंती करत आहेत. ‘अनेक त्रुटी असल्या तरी हे शक्तीशाली माध्यम आहे’ असं पंतप्रधानांचे चाहते त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोशल मीडियात सर्वाधिक फाॅलोअर्स आहेत. तसेच सर्वाधिक फॉलोअर्स असणारे जगातील टॉप फाईव्ह नेत्यांमध्येही त्यांची गणना होते. त्यांच्या या घोषणेमुळे सोशल मीडियात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेवर चौदा मिनिटांत तीन हजारांहून अधिक प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. मात्र, मोदींच्या जगभरातील चाहत्यांनी मोदींनी सोशल मीडियाचा त्याग करू नये, अशी विनवणी केली आहे. झटपट निर्णय घेणे हा मोदी यांचा गुणधर्म आहे.
पंतप्रधान ज्यांना फॉलो करतात अशांनीही #nosir हॅशटॅग वापरत पंतप्रधानांना सोशल मीडिया न सोडण्याचा सल्ला दिलाय. आत्तापर्यंत ७० हजारांहून अधिक जणांनी पंतप्रधानांच्या या ट्विटवर रिप्लाय केलाय. तर ३० हजारांहून अधिक जणांनी पंतप्रधानांचं ट्विट रिट्विट केलंय.