मोदीजी, तुम्ही शूर आहात. योद्धे आहात. चीनचा बदला घेणार का?: राऊत

मुंबई, दि. १७ जून २०२०: काल भारत आणि चीन यांच्यादरम्यान झालेल्या हिंसक चकमकीनंतर शिवसेनेने नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार वर निशाणा साधला आहे. काल चीन सोबत झालेल्या झटापटी मध्ये भारताच्या जवानांचा मृत्यू झाला. भारतीय सैन्यातील २० जवान गमावल्यानंतर शिवसेनेने मोदींना असे विचारले आहे की, पंतप्रधान मोदीजी, तुम्ही शूर आहात. योद्धे आहात. तुमच्या नेतृत्वाखाली चीनचा बदला घेणार का? चीनला करारा जवाब कधी देणार; असा सवाल शिवसेनेने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला केला आहे.

शिवसेनेतील नेहमीच चर्चेत असलेले नेते म्हणजे संजय राऊत यांनी काल आपल्या ट्विटरवरून नरेंद्र मोदी यांना असा चिमटा काढला. राऊत यांनी मोदींना टोमणा मारत असे लिहिले आहे की, चीनच्या अरेरावी ला सडेतोड उत्तर दिलं जाईल का? चीनने एकही गोळी चालवली नाही. तरीही आमचे २० जवान शहीद झाले. आपण काय उत्तर दिलं? चीनचे किती सैनिक मारले? चीन आपल्या भूप्रदेशात घुसला आहे का? पंतप्रधानजी, या संकटाच्या काळात देश तुमच्या सोबत आहे, पण सत्य काय आहे ते सांगा? काही तरी बोला. देशाला सत्य माहिती पडू द्या, असं आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.

पुढे राऊत यांनी त्यांच्या खास शैलीत नरेंद्र मोदी यांची स्तुती करत त्यांना चांगलाच टोला लगावला. ‘मोदीजी, तुम्ही शूर आणि योद्धे आहात. तुमच्या नेतृत्वात देश चीनचा बदला घेईल का? असा सवालही त्यांनी केला आहे.’ असा टोला त्यांनी मोदींना लगावला आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील खोचक टीका नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. ते म्हणाले की, ‘चीनने भारताच्या भूमीत घुसून आपल्या तीन सैनिकांना मारलं आहे. अशावेळी चीनला धडा शिकवला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत संपूर्ण देश आहे. आता मोदींनीही आक्रमक होऊन चीनला धडा शिकवला पाहिजे. झोपाळ्यावर बसून झालं. आता चीनकडे ‘लाल आँखे’ करून पहायची वेळ आली आहे. काय म्हणता?, ‘

काल लडाख येथे झालेल्या भारत आणि चीन यांच्यातील झटापटी नंतर राजकीय वातावरणात अशा टीका सुरू झाल्या आहेत. काल झालेल्या हल्ल्यामध्ये भारतीय सैन्यातील २० जवान शहीद झाले होते तर चीनच्या बाजूने ४३ सैनिकांचा मृत्यू झाल्याची बातमी ए एन आय कडून मिळाली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा