गोल पोस्ट महाराष्ट्र नागपूर आरएसएसच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त मोहन भागवतांचा स्वदेशी आणि स्वावलंबनाचा संदेश

आरएसएसच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त मोहन भागवतांचा स्वदेशी आणि स्वावलंबनाचा संदेश

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी भारताने आत्मनिर्भर होण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत स्वदेशी आणि स्वावलंबनाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. अमेरिकेने स्वतःच्या हितासाठी लागू केलेल्या ‘टेरिफ’ धोरणाचा फटका भारताला बसत असून, यामुळे स्वावलंबनाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.

नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर झालेल्या विजयादशमी सोहळ्यात भागवत यांनी आंतरराष्ट्रीय राजकारण, पहलगाम दहशतवादी हल्ला, शेजारील संघर्ष आणि हिमालयातील नैसर्गिक आव्हानांचा उल्लेख केला. “राष्ट्राराष्ट्रांमधील संबंध आवश्यक आहेत, मात्र निर्भरता लाचार करणारी नसावी. आत्मनिर्भरतेमुळेच भारत जगासमोर सक्षमपणे उभा राहू शकेल,” असे ते म्हणाले.

या सोहळ्यात पारंपरिक शस्त्रांसह पिनाका क्षेपणास्त्र, युद्धातील ड्रोन आणि रायफलचे शस्त्रपूजन झाले. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह परदेशी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भाषण करताना “संघात जातीभेदाला स्थान नाही आणि संघ अधिकाधिक मजबूत होत आहे” असे गौरवोद्गार काढले.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version