नीरेतील मोकाट डुकरांच्या बंदोबस्ताच्या मागणीसाठी १४ आगस्ट पासून उपोषण

पुरंदर, ५ ऑगस्ट २०२०: पुरंदर तालुक्यातील नीरा शहरामध्ये काही लोकांनी पाळलेल्या व गावात मोकाट सोडलेल्या डूकरांमुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने मात्र या बाबत कोणताही ठोस निर्णय घेत नसल्याने नीरा शहरातील काही लोकांनी, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी येत्या १४ ऑगस्टला नीरा ग्रामपंचायती समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

पुरंदर तालुक्यातील नीरा साधारण वीस ते पंचवीस हजार लोकवस्तीचे शहर आहे. मोठी बाजारपेठ, दोन जिल्हे व चार तालुक्यांच्या सीमेवर असलेले गाव दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. येथे बाजार पेठ मोठी आहे. मात्र येथील लोक गेल्या अनेक वर्षापासून गावात सोडण्यात आलेल्या मोकाट डुकरांच्या त्रासामुळे त्रस्त झालेले आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाकडे अनेक वेळा मागणी करूनही संबंधित वराह पालन करणाऱ्या लोकांवर कोणतीच कारवाई होत नाही. यामुळे येथील लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

या डुकरांचे अनेक प्रताप पुढे आले आहेत. कोरोनामुळे भाजीपाला बाजार बंद आहे. त्यामुळे या डुकरांना मिळणारे अन्न बंद झाले आहे त्यामुळे ते लहान मुलांच्या हातातील खाद्य पदार्थ पळवत असतात प्रसंगी मुलांवर धावून येतात.‌ दुचाकीस्वारांचे डुकरामुळे अपघात होत आहेत. मंदीरे, प्रार्थनास्थळे, स्मशानभूमी येथे डुकरांचा मुक्त वावर असतो. त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. गावाशेजारील शेतातही डुकरे नासधूस करीत असतात. त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. पाणी पुरवठा केंद्राजवळ (जॅकवेल) डूकरांमुळे पाणी दुषित होत आहे. गावात मेलेली डूकरे स्मशानभूमी शेजारी नदीपात्रात पाण्यात टाकली जात आहेत. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. मध्यंतरी याच डुकरांच्या प्रश्नामुळे मोठी मारामारी झाली, गंभीर दुखापत, बेकायदेशीर जमाव जमवणे इ.सारखे गुन्हे दाखल झालेले आहेत. यामधुनच हे दोन्ही व्यावसायिक एकमेकाची डूकरे मारत आहेत. याचा परिणाम शहराच्या स्वास्थ्यावर होत आहे. असे जेधे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

नीरा शहरातील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे वेळोवेळी पत्र व्यवहार करुनही याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे अखिल भारतीय मराठा महासंघ, शाखा नीराचे अध्यक्ष सुभाष दत्तात्रय जेधे, टी.के.जगताप, रणधिर उर्फ नंदकुमार आनंतराव शिंदे यांनी दि.१४/०८/२०२० रोजी सकाळी १०.०० वाजल्या पासून ग्रामपंचायत कार्यालय निरा-शिवतकार समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा