गोल पोस्ट महाराष्ट्र नाशिक दीड महिन्यावर पावसाळा, आयुक्तांचा खड्ड्यांसाठी अल्टिमेटम

दीड महिन्यावर पावसाळा, आयुक्तांचा खड्ड्यांसाठी अल्टिमेटम

नाशिक, ३ मे २०२३: नाशिक शहरात गॅसपाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून वर्दळ असलेले रस्ते फोडण्यात आले आहेत. पावसाळा दीड महिन्यावर येऊन ठेपला आहे. गेल्या वर्षी रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन महापालिकेचे वाभाडे निघाले होते. हा अनुभव पाहता यंदा ३१ मेपर्यंत शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविले गेले पाहिजेत, असा अल्टिमेटम आयुक्तांनी बांधकाम विभागाला दिला आहे.

शहरात गेल्या वर्षी ६०० कोटी रुपये खर्चून नवीन रस्ते बांधण्यात आले होते. अनेक रस्त्यांची डागडुजी करून त्यांचे अस्तरीकरण करण्यात आले होते. मात्र पावसाने महापालिकेचे पितळ उघडे पाडले. मुख्य बाजारपेठेसह शहर व उपनगरात रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले होते. नवीन रस्ते उखडल्याने बांधकाम विभाग व ठेकेदार यांची युती उघड झाली होती.

त्यावेळी आयुक्तांनी बांधकाम विभाग व ठेकेदारांची खरडपट्टी केली होती. यंदादेखील नाशिककरांना हा मनस्ताप सहन करावा लागू शकतो. ते पाहता आयुक्तांनी बांधकाम विभागाची बैठक घेत मे अखेरपर्यंत सर्व रस्ते खड्डे मुक्त करण्याची, अशी सूचना केली. तसेच गॅस पाईपसाठी खोदकाम करणाऱ्या कंपणीला मे अखेरनंतर काम करायचे नाही, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version