मान्सून संपूर्ण महाराष्ट्रभर पसरला, हवामान विभागाची घोषणा

पुणे २५ जून २०२३: मान्सूनच्या आगमनाची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्वांसाठीच एक आनंदाची बातमी आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून संपूर्ण महाराष्ट्रभर पसरला आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबतची घोषणा केली. गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मिरचा काही भाग वगळता संपूर्ण देशात मान्सून सक्रिय झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली.
सध्या राज्याच्या काही भागात पाऊस कोसळत आहे. अद्याप काही ठिकाणी पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

मुंबई आणि दिल्लीत मान्सून सक्रिय झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाकडून (IMD) करण्यात आली आहे.यावर्षी मुंबईत उशिराने मान्सून दाखल झाला आहे तर दिल्लीत दोन दिवस आधीच मान्सूनचे आगमन झाले आहे. परवापासूनच मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या विविध भागात चांगला पाऊस कोसळत आहे. त्यामुळे हवामान विभाग मुंबईत मान्सून दाखल झाल्याची घोषणा कधी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर आज हवामान विभागाने मुंबईसह दिल्लीत मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली आहे.

राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. कुठे हलका ते मध्यम स्वरुपाचा तर कुठे जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईत कालपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. अनेक ठिकाणी पहिल्याच पावसातच मुंबईची तुंबई झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर राज्यातील रत्नागिरी,वाशिम, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, पालघर, वसई विरार, कोल्हापूर या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. तर काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा