नवी दिल्ली, २९ ऑगस्ट २०२०: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दरम्यान येत्या १ सप्टेंबर पासून नियमांमध्ये आणखीन शिथिलता देण्यात येणार आहे. जसे जसे नियमांमध्ये शिथिलता देण्यास सुरुवात करण्यात आली तस तसे कोरोनाची प्रकरणे सापडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. मागील चोवीस तासांमध्ये देशभरात तब्बल ७६ हजार ४७२ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, १ हजार २१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येने आता ३४ लाखांचा टप्पा देखील ओलांडला आहे.
देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ३४ लाख ६३ हजार ९७३ वर पोहचली आहे. यामध्ये ७ लाख ५२ हजार ४२४ अॅक्टिव्ह रुग्ण, रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेले व करोनातून बरे झालेले २६ लाख ४८ हजार ९९९ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ६२ हजार ५५० जणांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.
अमेरिकेत कोरोनामुळे १ लाख ८५ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे त्या खालोखाल ब्राझीलमध्ये १ लाख १९ हजार जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. भारतात जून महिन्यात अनलॉक प्रक्रिया राबवण्यास सुरूवात झाली. यानंतर कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येत आणि करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत वाढ झाल्याची दिसून आली.
न्यूज अनकट प्रतिनिधी