पिंपरीच्या मोरवाडी आयटीआयचा निकाल ९३ टक्के, यशाची भरारी!

पिंपरी येथील मोरवाडी आयटीआयने क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीम (CTS) अंतर्गत घेण्यात आलेल्या AITT (All India Trade Test) मुख्य परीक्षेच्या २०२५ च्या निकालात घवघवीत यश मिळवले आहे. संस्थेचा एकूण निकाल ९३ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, ३८८ पैकी ३६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. केवळ २६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले, हे संस्थेच्या शैक्षणिक दर्जाचे द्योतक आहे.

या निकालात २०२३ च्या तुकडीतील विद्यार्थ्यांचा यशाचा दर ९१ टक्के तर २०२४ च्या तुकडीतील विद्यार्थ्यांचा निकाल ९८ टक्के इतका समाधानकारक राहिला. विशेष म्हणजे, इलेक्ट्रिशियन, फिटर आणि मशिनिस्ट ग्राइंडर यांसारख्या महत्त्वाच्या ट्रेड्सनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. मशिनिस्ट ट्रेडमध्येही ९७ टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळवले.

इतर ट्रेड्सचा निकालही समाधानकारक आहे. वेल्डर (एनएसक्यूएफ) मध्ये ८८%, प्लंबरमध्ये ८९% आणि फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंगमध्ये ८५% विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. मात्र, ऑपरेटर अॅडव्हान्स मशिन टूलमध्ये केवळ २२% तर शीट मेटल वर्कर ट्रेडमध्ये फक्त ४४% विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने या विभागांवर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या यशाने मोरवाडी आयटीआयमधील अध्यापनाचा दर्जा आणि विद्यार्थ्यांमधील अभ्यासाचा उत्साह पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे