मोशीत पाण्यासाठी हाहाकार;टँकर माफियांची चांदी, नागरिक त्रस्त..

58
Water crisis in Moshi; tanker mafia's money, citizens suffer..
मोशीत पाण्यासाठी हाहाकार

Water crisis in Moshi: उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मोशीत पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. विनायक नगर, वाघेश्वर कॉलनी आणि मोशी गावात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. महापालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांना टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. कर भरूनही पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे.

मोशीची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, परंतु त्या प्रमाणात पाणीपुरवठा होत नाही. दरवर्षी उन्हाळ्यात मोशीकरांना हीच समस्या भेडसावते. यंदाही परिस्थिती वेगळी नाही. विनायक नगर, सावता माळी नगर, संजय गांधी नगर, वाघेश्वर कॉलनी, मोशी गाव, गायकवाड वस्ती, शिवरस्त्यावरील सोसायटी परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून पाणीटंचाई जाणवत आहे.

नागरिकांना पाण्याचे टँकर मागवून पाण्याची गरज भागवावी लागत आहे. यामुळे नागरिकांवर आर्थिक भुर्दंड पडत आहे. सदनिकाधारकांना पिण्याचे पाणीही विकत घ्यावे लागत आहे. “पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. महापालिकेने कर घेते, त्याचप्रमाणे पाणी दिले पाहिजे. कर भरा आणि पिण्याच्या पाण्यासाठीही पैसे मोजा, अशी अवस्था नागरिकांची झाली आहे,” असे स्थानिक नागरिक रुपाली अल्हाट यांनी सांगितले.

“महापालिका पाणीपुरवठा करण्यासाठी कमी पडत आहे. टँकर माफिया राज सुरू आहे. त्याचा आर्थिक फटका मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे,” असे चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी सांगितले.

याबाबत महापालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता, “काही तांत्रिक अडचणींमुळे मोशीत पाणीपुरवठा कमी दाबाने झाला. तक्रारींची दखल घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे,” असे पुरवठा विभागाचे उपअभियंता शेखर गुरव यांनी सांगितले.मोशीतील पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिका प्रशासनाने या समस्येवर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे