मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना पुन्हा अवकाळी पावसाने झोडपले, परभणी जिल्ह्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

पुणे, दि, २४ मे २०२३ -: राज्यभर सर्वत्र उन्हाची काहीली सुरू आहे. पावसाळा तोंडावर असतानाच, पावसाळा सुरु होण्यपूर्वी पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला आहे. परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांच्या काही भागात मध्यम ते मुसळधार अवकाळी पाऊस झाला. तर परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला आहे.

परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथे सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे येथील आठवडे बाजारात ग्राहक आणि व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यामुळे आठवडे बाजारातील वडाच्या झाडाच्या फांद्या तुटून पडल्या, तसेच त्याच्याच बाजूला असलेले लिंबाच्या झाडाची फांदी तुटल्याने विजेच्या तारा तुटल्या. भाजीपाला विक्रेत्यांची पालं उडून गेली. व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले.त्याचबरोबर जिंतूर, सेलू तालुक्यातही पाऊस झाला.

जालना जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली. जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरासह फत्तेपूर, विरेगाव, मासनपूर आदी भागात दुपारी विजांच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह अर्धा तास जोरदार पाऊस झाला. पावसाने सखल भागात पाणी साचले होते.

त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली. फुलंब्री तालुक्यातील पिरबावडा परिसरात सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाच्या तडाख्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळली. धाराशिव जिल्ह्यात वाशी तालुक्यात सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावस झाला. शेतशिवारांतील झाडे उन्मळून पडली असून, काही ठिकाणी विद्युत खांबही आडवे झाले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा