कोळीकोड, ९ फेब्रुवारी २०२३ :केरळमधील झिया पवल आणि जाहद या तृतीयपंथी जोडप्याला मूल झाले आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयात या जोडप्यांपैकी जाहदची बुधवारी प्रसूती झाली आहे. तृतीयपंथीयांना मूल होण्याची देशातील ही पहिलीच घटना असल्याच दावा केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती झाली. बाळ आणि जाहदची प्रकृती उत्तम असल्याचे झिया पवलने सांगितले. मात्र मुलगा झाला की मुलगी हे त्यांनी जाहीर केलेले नाही. ही बाब लगेच जाहीर करू इच्छित नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
- आई-बाबा होण्याचे स्वप्न साकार
इन्स्टाग्रामवर छायाचित्र पोस्ट करून जाहद आठ महिन्यांचा गर्भवती असल्याचे पवलने नुकतेच जाहीर केले होते. ‘माझा जन्म किंवा शरीर स्त्रीचे नव्हते. पण माझ्यातील स्त्रीचे आई होण्याचे आणि त्याचे बाबा होण्याचे स्वप्न साकार होणार आहे. आठ महिन्यांचा गर्भ जाहदच्या पोटात आहे. तृतायपंथीय पुरुषाची गर्भधारणा ही भारतातील पहिलीच घटना असल्याचे आम्हाला समजले आहे, असे पोस्टमध्ये म्हटले होते.
लिंग परिवर्तनानंतर गर्भधारणापवल आणि जाहद हे गेल्या तीन वर्षांपासून एकत्र राहत आहेत. जाहदचे लिंग परिवर्तन महिलेतून पुरुषात झाले आहे. लिंग परिवर्तन प्रक्रियेनंतर गर्भधारणा झाली तरी कोणताही शारीरिक त्रास जाणवला नाही,’ असे कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी सांगितले. एका वृत्तपत्रातील वृत्तानुसार लिंग परिवर्तन शस्त्रक्रियेच्यावेळा जाहदचे स्तन काढण्यात आले होते. पण गर्भायश आणि अन्य अवयव तसेच ठेवले होते. त्यामुळेच गर्भधारणा शक्य झाली.
जाहदची प्रसूती झाल्यानंतर जियाने त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. जाहदचे गरोदरपणातील फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आमच्यावर टीका केली. तरीही आम्ही धैर्याने व संयमाने परिस्थितीला सामोरे गेलो. आज जाहदची प्रसूती झाली. ही प्रसूती म्हणजे टीका करणाऱ्यांना एक प्रकारचे उत्तरच मिळाले आहे, असेही जियाने सांगितले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.