जालना १३ जुलै २०२४ : जालन्यातल्या बदनापूर तालुक्यातील वरुडी फाट्याजवळील हिंदुस्तान पेट्रोल पंपाजवळ, छत्रपती संभाजीनगरकडून जालनाकडे जाणाऱ्या मोटरसायकलला (क्रमांक MH21-CB9967) पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने जोरदार धडक देऊन चिरडल्याने दोघे ठार तर एक जण गंभीर जखमी झालाय.
या भीषण अपघातात मोटारसायकलवरील तीन तरुणांपैकी शेख नाझीम शेख हमीद (वय २३), शेख कलीम शेख गुलाब नबी (वय २१) हे दोघे जागीच ठार तर मुजमिल अन्सार (वय १८) हा जखमी झाला आहे. हे तिघेही काकडे वस्ती वरुडी शिवार (ता. बदनापूर) येथील रहिवासी आहेत. दोन मृत तरुणांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय ग्रामीण रुग्णालय बदनापूर येथे पाठविले असून जखमींला नूर हॉस्पिटल वरूडी येथे दाखल केले आहे.
अपघातग्रस्त मोटारसायकल रोडच्या बाजूला लावून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आर. के.निकम यांच्यासह अंमलदार राठोड, दाभाडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करून, रोडवरील वाहतूक सुरळीत केली.
न्यूज अनकट प्रतिनीधी : विजय साळी