खासदार अमोल कोल्हे झाले होम क्वारंटाईन 

पुणे, दि. ८ जुलै २०२० : शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल कोल्हे यांनी स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतले आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दोन नेत्यांच्या संपर्कात आल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. ट्विटरद्वारे त्यांनी ही माहिती दिली.

एक जुलै ते चार जुलै या कालावधीत अमोल कोल्हे त्यांच्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. याचदरम्यान संपर्कात आलेल्या दोन नेत्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तातडीने त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली. त्यांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले. त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. मात्र मी स्वतः एक डॉक्टर असल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, माझ्यामुळे कुणाचे आरोग्य धोक्यात येऊ नये या भावनेतून मी होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला आहे असे ते म्हणाले.

सार्वजनिक कार्यक्रमात अथवा दौऱ्यावर असताना अनेकदा नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. काही जण मास्कचा वापर करीत नाहीत अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. त्याच्याप्रमाणे ”मी घरी असलो तरी माझ्या मतदारसंघाबरोबर इतर भागातील नागरिकांच्या संपर्कात राहून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे.” असे ते म्हणाले.

तसेच सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून विकासकामांमध्ये कुठे खंड पडू देणार नाही, असे आश्वासन खासदारांनी दिले आहे. जनतेला काही अडचण असल्यास सोशल मीडियाच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर अथवा संपर्क कार्यालय मध्ये संपर्क करू शकता असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा