अमरावती, ६ ऑगस्ट २०२०: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना करोनाची लागण झाली आहे. नवनीत राणा यांच्या कुटुंबातील दहा जणांना आधीच करोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चार दिवस आधी नवनीत राणा यांची मुलगी आणि मुलासोबत कुटुंबातील इतर सदस्यांना करोनाची लागण झाली होती. त्याच बरोबर आता त्यांचे पती आमदार रवी राणा यांनाही अस्वस्थ वाटू लागले असून ते आज करोनाची चाचणी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नवनीत राणा मुलांची काळजी घेण्यासाठी घरीच थांबल्या होत्या. गुरुवारी अस्वस्थ वाटू लागल्याने चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांनाही आता रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून त्यांच्यावर उपचार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यांनतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची सुद्धा टेस्ट करण्यात आली. सर्वांनी दक्षता घ्यावी आणि सुरक्षित राहावं असे आवाहन नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या वतीने करण्यात येत आहे.
नवनीत राणा या खासदार असल्याने त्यांना मतदारसंघात फिरावे लागते. करोनाचे संकट असल्याने करोना परिस्थितीचा आढावा घेतानाच विभागांमध्ये जाऊन परिस्थितीची माहिती घेण्याचे काम त्या करत होत्या. शिवाय त्यांनी मतदारसंघात स्वत: धूर फवारणी केली होती. सतत कार्यकर्ते आणि मतदारांच्या त्या संपर्कात होत्या. त्यामुळेच त्यांना करोनाची लागण झाली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी