मुंबई, १६ सप्टेंबर २०२३: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा, यांच्या देशद्रोहाच्या खटल्यात वारंवार गैरहजर राहण्यावर मुंबई सत्र न्यायालयाने आक्षेप घेतला होता. तरीसुद्धा पुन्हा एकदा खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा आज मुंबई सत्र न्यायालयात हजर राहिले नाहीत.
याआधीही गुरुवारी मुंबईतील विशेष न्यायालयाने खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना फटकारले होते. मात्र, राणा दाम्पत्य राजद्रोहाच्या खटल्यात जामीन रद्द करण्यासाठी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या याचिकेशी संबंधित कामकाजात वैयक्तिकरित्या किंवा त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून हजर न राहून वारंवार टाळाटाळ करताना दिसत आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खाजगी निवासस्थानी हनुमान चालीसाचे पठण केल्याप्रकरणी गेल्या वर्षी दाखल झालेल्या गुन्ह्यात दोघांनाही जामीन मंजूर झाला होता. याबाबत पोलिसांनी याचिका दाखल केली होती की, त्यांनीं जामीन अटींचे उल्लंघन करून या प्रकरणाबाबत मीडियासमोर भाष्य केले आणि त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड