खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट; म्हणाले…

नवी दिल्ली, ९ डिसेंबर २०२२ भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर उदयनराजे यांनी पंतप्रधान कार्यालयाला एक पत्र दिले असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला होता. त्यामुळे त्यांना हटवण्यासाठी २३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवले होते. शिवाजी महाराजांचा राज्यपालांनी अवमान केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना तीव्र असून राज्यात ठिकठिकाणी निदर्शने होत आहे, असे त्या पत्रात नमूद केले होते, अशी माहिती उदयनराजे यांनी दिली.

तसेच राज्यपाल पद हे संवैधानिक पद असल्याने त्या पदावरून हटवण्याबाबतच्या काही प्रक्रिया असतात. त्या पूर्ण करूनच राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून कारवाई केली जाते. त्यामुळे राज्यपालांवर कारवाई होईल, अशी मला आशा आहे, असे ही उदयनराजे यांनी यावेळी सांगितले.

पुढे ते म्हणाले, आम्ही प्रक्रियेचा भाग म्हणून मोदींच्या कार्यालयात आज पुन्हा पत्र दिले आहे. पंतप्रधानांचे शेड्यूल व्यस्त असल्याने त्यांच्याशी या विषयावर बोलणे झाले नाही. पण त्यांच्या कार्यालयात पत्र देऊन आम्ही आमच्या भावना कळवल्या आहेत.

दरम्यान, कोणत्याही मुद्द्यावर राज्यात तेढ निर्माण होऊ नये ही भावना आहे. शिवाजी महाराज देशाची अस्मिता आहे. त्यांच्याबद्दल बोलताना मोजूनमापून बोलावे. राज्यपाल हे पद मोठे आहे. त्या पदावरील व्यक्तीने कोणत्याही महापुरुषांबद्दल अवमानकारक बोलू नये. राज्यपालांच्या विधानामुळे असंतोष पाहायला मिळत आहे. त्यावर तोडगा निघाला पाहिजे. राज्यातील परिस्थिती निवळावी याबाबत पंतप्रधान कार्यालयाला बोललो. आता ते कार्यवाही करतील अशी खात्री आहे, असे ते म्हणाले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा