पुणे, ५ जून २०२३: शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे २०२४ ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीकडून लढणार की भाजपकडून, याबाबत काही दिवसांपासून तर्कवितर्क लढवले जात असतानाच खासदार कोल्हे यांनी आपण राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे आज राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितले. मतदारसंघातील आमदार व पदाधिकाऱ्यांनी देखील कोल्हे यांनाच उमेदवारी देण्याची मागणी यावेळी केल्याने कोल्हे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आज पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात शिरुर, जालना आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे आदी उपस्थित होते.
शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीसाठी खासदार अमोल कोल्हे, चेतन तुपे, अतुल बेनके यांच्यासह शिरूर मतदारसंघातील आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत माजी आमदार विलास लांडे यांनी लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले. मतदारसंघातील इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मत व्यक्त करताना खासदार अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्याची भूमिका मांडली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर