एमपीएससीचा निकाल पुन्हा तपासावा, विनोद पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई, दि. २२ जून २०२० : अलीकडेच जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निकालावर प्रश्नचिन्ह उभे राहिल्याचे दिसत आहे. या निकालाबाबत अनिश्चितता असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे नेते विनोद पाटील यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून निकाल पुन्हा तपासण्याची मागणी केली आहे. त्यामुळे एमपीएससी निकालाचा पेच भविष्यात वाढणार असल्याचे दिसत आहे.

विनोद पाटील यांनी असे म्हटले आहे की, आयोगाने एमपीएससीच्या निकालात जुन्याच अधिकाऱ्यांची त्याच पदावर निवड केली गेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या निकालामध्ये जवळपास ३० अधिकाऱ्यांना नव्या निकालात जुन्याच ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रश्नावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि राज्य सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

याबाबत विनोद पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी असे म्हटले आहे की, “एमपीएससीच्यावतीने २०१९ मध्ये परीक्षा घेण्यात आल्या. यामध्ये अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्याला नवे अधिकारी मिळाले. परंतू यात एक नैराश्य आणणारी बाब म्हणजे यातील ३० पेक्षा अधिक अधिकारी राज्य सरकारच्या सेवेत रुजू आहेत. या अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा २०१९ च्या लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षांमध्ये भाग घेतला आणि उत्तीर्ण झाले. मात्र, जे अधिकारी आधी उपजिल्हाधिकारी होते, ते पुन्हा उपजिल्हाधिकारी झाले. जे तहसिलदार होते पुन्हा तहसिलदार झाले. यामुळे राज्य सरकारचा वेळ वाया गेला. परीक्षेचा खर्च वाया गेला. यातून महाराष्ट्र लोकसेवा आयोग अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे.”

“परीक्षा देणाऱ्या अधिकाऱ्यांनी पुन्हा पुन्हा अशा प्रकारे एकाच पदाकरता परीक्षा देऊन शासनाची दिशाभूल न करणे ही त्यांची नैतिकता आहे. परंतू तसे घडले नाही. आधीच अनेक निकाल उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या स्तरावर याविषयी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आदेश द्यावेत. तात्काळ हा निकाल सुधारित व्हावा. यामध्ये ३० पेक्षा अधिक नव्या युवकांना अधिकारी होण्याची संधी मिळेल. उच्च पदावर जाण्याची संधी मिळेल. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कारवाई करावी,” अशी मागणी विनोद पाटील यांनी केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा