पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसह आयोगाचे विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता एस. एम. जोशी पूल, नवी पेठ येथे सुरू होणार आहे.

२७ सप्टेंबर रोजी आंदोलन करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे त्या दिवशी आंदोलनास परवानगी देता येणार नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर २ ऑक्टोबर, गांधी जयंतीच्या दिवशी आंदोलनास परवानगी देण्याबाबत पोलिसांनी सहमती दर्शविल्याचे विद्यार्थी प्रतिनिधींनी सांगितले.
अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम
MPSC विद्यार्थ्यांनी यापूर्वीही आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन केले होते. त्यावेळी भीमनवार यांचा कार्यकाळ नुकताच सुरू झाल्याने राजीनामा देता येणार नसल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, अलीकडील काळात आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत आणि कथित पेपरफुटीच्या प्रकरणांबाबत प्रश्न उपस्थित झाल्याने विद्यार्थी पुन्हा आक्रमक झाले आहेत. अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विविध मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.याच पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि MPSC विद्यार्थी आंदोलक यांच्यात संयुक्त बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या बैठकीत अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विद्यार्थ्यांच्या इतर प्रमुख मागण्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
रोहित पवारांचा आंदोलनाला पाठिंबा
या आंदोलनाला आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा दिला आहे. आंदोलन पूर्णतः अराजकीय असून केवळ विद्यार्थी हितासाठी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.रोहित पवार म्हणाले की, विद्यार्थ्यांना न्याय मिळणे आणि परीक्षांमधील पेपरफुटी रोखणे हे प्रमुख मुद्दे आहेत. विद्यार्थ्यांसाठी सर्व पातळ्यांवर संघर्ष करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात वेळीच लक्ष घालून विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
गरज पडल्यास राहुल गांधी पुण्यात येणार?
काँग्रेस नेते आणि माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनीही आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत काँग्रेस पक्षाची भूमिका सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ. विश्वजीत कदम यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी यापूर्वी MPSC विद्यार्थ्यांशी संवाद साधला असून त्यांच्या मागण्यांबाबत ते आग्रही आहेत. आपण स्वतः पक्षाच्या पातळीवर या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गरज भासल्यास राहुल गांधीदेखील विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी पुण्यात उपस्थित राहू शकतात, असा दावा त्यांनी केला.
पोलीस आयुक्तांसोबतच्या बैठकीला विद्यार्थी प्रतिनिधींसह विविध पक्षांचे नेते उपस्थित
आंदोलनाच्या परवानगीसंदर्भात झालेल्या बैठकीला विद्यार्थी प्रतिनिधी तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. यामध्ये काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राहुल डंबाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रविकांत वरपे, माजी नगरसेवक तथा शहराध्यक्ष श्रीकांत पाटील, सुनील माने आणि प्रथमेश अबनावे यांचा समावेश होता.तसेच आंदोलनाचे प्रमुख आयोजक आणि विद्यार्थी प्रतिनिधी अक्षय कांबळे, प्रमोद पाटील, विश्वजीत जाधव, संग्राम नरळे, किरण जगताप, सिद्धांत जांभुळकर, नितीन गीते, नितीन आंधळे आणि अजिनाथ केदार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.आता २ ऑक्टोबरपासून पुण्यात सुरू होणाऱ्या या बेमुदत आंदोलनाकडे MPSC विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – दिनेश वढणे