Overcrowding in MSRTC buses: खासगी ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आढळल्यास तत्काळ कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, राज्याच्या खेड्यापाड्यातून शहरांना जोडणाऱ्या ‘लालपरी’ अर्थात एसटी बसमध्ये जीवघेणी गर्दी होत असतानाही कोणतीच कारवाई होताना दिसत नाही, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. महिलांना अर्ध्या तिकीटाचा लाभ मिळत असल्याने सध्या एसटी बसेस प्रवाशांनी अक्षरशः खचाखच भरलेल्या आहेत.
उन्हाळ्याची सुट्टी आणि लग्नसराईमुळे गावी जाणाऱ्यांची तसेच पर्यटनासाठी निघणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचा थेट परिणाम एसटी बसेसवरील गर्दीत दिसून येत आहे. अनेक मार्गांवर उभं राहायलाही जागा नसते. विशेष म्हणजे, याच स्थितीत जर एखादी खासगी बस आढळली, तर तिच्यावर त्वरित दंड ठोठावला जातो. मग, ‘लालपरी’मध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असताना कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न आता प्रवाशांना सतावत आहे.पुणे विभागात तर ग्रामीण आणि शहरी भागातील बसेसची अवस्था बिकट आहे. अपुऱ्या बस फेऱ्यांमुळे प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे अनेक मार्गांवर एसटी महामंडळाने जास्तीत जास्त बसेस सोडाव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.बसमधील वाढती गर्दी पाहून अनेकदा चालक आणि वाहक प्रवाशांना पुढील बसने प्रवास करण्याचा सल्ला देतात. मात्र, वेळेच्या घाईगर्दीत असलेला कोणताही प्रवासी त्यांचे म्हणणे ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतो.पुणे विभागात एकूण १४ आगार आहेत, परंतु मागणीच्या तुलनेत बसेसची संख्या अपुरी आहे. त्यामुळे प्रवाशांना तासन् तास बसची प्रतीक्षा करावी लागत आहे.
पुणे विभागाच्या उत्पन्नात दीडपटीने वाढ
दुसरीकडे, एप्रिल महिन्यात उन्हाळी सुट्टी आणि लग्नसराईमुळे पुणे विभागाच्या उत्पन्नात तब्बल दीडपटीने वाढ झाली आहे. याचा फायदा निश्चितच महामंडळाला होत आहे, परंतु प्रवाशांच्या सुरक्षिततेचे काय? या संदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले म्हणाले, “प्रवासी वाहतुकीचे नियम सार्वजनिक क्षेत्रातील सर्व वाहनांना समान लागू आहेत. खासगी वाहनांप्रमाणेच एसटी बसचीही तपासणी केली जाते आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आढळल्यास नियमानुसार दंड आकारला जातो.” मात्र, प्रत्यक्षात कारवाई होताना दिसत नसल्याने त्यांच्या या विधानावर प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
सध्या पुणे-सोलापूर मार्गावर सर्वाधिक गर्दी असून त्यापाठोपाठ कोल्हापूर, सांगली, सातारा आणि नाशिक मार्गावरही प्रवाशांची मोठी झुंबड पाहायला मिळत आहे. आता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एसटी प्रशासन काय पाऊले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे