मुंबई: देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अवघ्या ४ दिवसात कोसळल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं महाविकासआघाडीचं सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार (दि.२६) महाविकासआघाडीचे नेत्यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला. यावेळी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांनी उद्धव ठाकरे येत्या गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील असे सांगितले.
अबू आझमी यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या २८ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी ५ वाजता हा शपथविधी होईल. शिवाजी पार्कवर मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी पार पडणार आहे. यासाठी महापालिकेला तयारीचे आदेश देण्यात आले आहेत.
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद ट्रायडेंट हॉटेलला पार पडली. यावेळी तिन्ही पक्षांच्या आघाडीला महाराष्ट्र विकास आघाडी म्हणून नाव देण्यात आले. या महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली. याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे विराजमान होणार आहेत.