मुळा नदी सुधारणा;पर्यावरणवाद्यांच्या अपेक्षा धुळीस,महापालिकेचा बैठकीचा फार्स

27
Environmentalists oppose Mula River beautification project
मुळा नदी सुधारणा;पर्यावरणवाद्यांच्या अपेक्षा धुळीस

Environmentalists oppose Mula River beautification project: मुळा नदीच्या कथित सुधारणेच्या नावाखाली सुरू असलेल्या सुशोभीकरण प्रकल्पाला पर्यावरणवाद्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या गंभीर विषयावर तोडगा काढण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला पर्यावरण वाद्यांसोबत तातडीने बैठक घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, बुधवारी (दि. १६) पिंपरी-चिंचवड महापालिकेत बहुप्रतिक्षित बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने पर्यावरणवाद्यांचा संयम आता संपला आहे. महापालिकेने केवळ बैठकीचा देखावा करत वेळ काढला, असा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला असून, आपला आंदोलनाचा निर्धार त्यांनी कायम ठेवला आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतून वाहणाऱ्या मुळा नदीच्या काँक्रिटीकरण आणि सुशोभीकरणाच्या कामामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह धोक्यात येणार आहे. नदी अरुंद होणार असल्याने परिसरातील जैवविविधतेवर गंभीर परिणाम होणार असल्याची भीती पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पर्यावरणप्रेमी संघटनांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर महापालिका प्रशासनाने तातडीने बैठक आयोजित केली. या बैठकीत महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त उमेश ढाकणे आणि पर्यावरण विभागाचे शहर अभियंता संजय कुलकर्णी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. तर, पर्यावरणवादी संघटनांचे प्रतिनिधित्व जलबिरादरी संस्थेचे नरेंद्र चूघ, ज्येष्ठ पर्यावरणवादी धनंजय शेडबाळे, पिंपरी-चिंचवड सिटिझन फोरमचे तुषार शिंदे, बाबा भोईर, सुरेश भोईर, सागर चिंचवडे, सूर्यकांत मुथियान आणि शुभम पांडे यांनी केले.

बैठकीदरम्यान, पर्यावरणवाद्यांनी आपली परखड भूमिका स्पष्टपणे मांडली. नदी सुधारणेच्या नावाखाली केवळ काँक्रिटीकरण करून नदीचा नैसर्गिक आकार बदलणे योग्य नाही. सुशोभीकरणाऐवजी नद्यांची स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. जोपर्यंत सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करून ते नदीत सोडले जात नाही, तोपर्यंत कोणताही नवीन प्रकल्प राबवू नये, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. तसेच, सध्या सुरू असलेली वृक्षतोड त्वरित थांबवण्याची मागणीही त्यांनी केली. गेल्या दोन दशकांपासून नदी स्वच्छतेच्या केवळ गप्पा मारल्या जात आहेत, प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही, असा आरोप करत प्रशासनाकडून केवळ ‘धूळफेक’ केली जात असल्याचे मत पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केले.

पर्यावरणवादी शुभम पांडे यांनी नैसर्गिक नदीकाठ उद्ध्वस्त झाल्यास तेथील जैवविविधतेचे काय होणार, असा थेट सवाल प्रशासनाला विचारला. मात्र, या महत्त्वपूर्ण प्रश्नाचे कोणतेही समाधानकारक उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले नाही. महापालिकेने बोलावलेल्या या बैठकीत केवळ प्रश्नोत्तरांचा फार्स झाला, कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही, याबद्दल पर्यावरणवाद्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे, पर्यावरणवाद्यांकडून सुरू असलेले ‘मुळा नदी बचाव’ आंदोलन यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू ठेवण्याचा निर्धार ज्येष्ठ पर्यावरणवादी धनंजय शेडबाळे यांनी व्यक्त केला आहे. बैठकीला महापालिका आयुक्तांसह प्रमुख पर्यावरणवादी उपस्थित असूनही कोणताही सकारात्मक परिणाम न निघाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी,सोनाली तांबे