मुंबई, २६ सप्टेंबर २०२३ : २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात सहभाग असणाऱ्या पाकिस्तानी वंशाच्या तहव्वूर राणा या कॅनेडियन नागरिकावर मुंबई क्राईम ब्रँचने ४०५ पानांचे, पाचवे पुरवणी आरोपपत्र दाखल केले. मात्र, राणा सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील तुरुंगात शिक्षा भोगत आहे. कॅनडाचा व्यापारी तहव्वूर राणा हा आयएसआय आणि लष्कर- ए-तैयबाचा कार्यकर्ता असल्याचा आरोप आहे. या आरोपपत्रात राणावर २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड डेव्हिड कोलमन हेडलीला पाठिंबा दिल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आलाय.
मुंबईतील दहशतवादी हल्ल्यापूर्वी राणा मुंबईतील एका हॉटेलमध्ये १० दिवस थांबला होता. या संदर्भातील पुरावा म्हणून गुन्हे शाखेने आरोपपत्रात राणाच्या पासपोर्टची प्रतही सादर केली आहे, जी राणाने हॉटेलमध्ये मुक्कामादरम्यान सादर केली होती. मुंबईत राणाने ११ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर २००८ या कालावधीत आपल्या नावावर हॉटेल रूम बुक केली होती. हॉटेलमधील मुक्काम आणि हॉटेलमधून पोलिसांना सापडलेले इतर पुरावेही या नव्या आरोपपत्रात दाखल करण्यात आले आहेत.
या संदर्भात आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. तथापि, यापूर्वी, २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले होते की, या प्रकरणातील आरोपी पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा व्यापारी तहव्वूर राणा याचे संभाव्य प्रत्यार्पण हा आता काही महिन्यांचा प्रश्न आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड