मुंबईतून कस्टडीमधून पसार महिला आरोपी अखेर वाळूजमध्ये पोलिसांच्या जाळ्यात

अंधेरी(पूर्व) एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कस्टडीमधून पळून गेलेली महिला आरोपी दिव्या रवी उर्फ पॉपट काळे हिला वाळूज पोलिसांनी शिवराई परिसरातून जेरबंद केले. तिच्यासोबत असलेल्या तीन महिला साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं.845/2025 कलम 305(अ),3(5) बीएनएस या गुन्ह्यात 6 नोव्हेंबर रोजी ही महिला अटकेत होती. मात्र 7 नोव्हेंबर रोजी कस्टडीमधून ती पसार झाली आणि तिच्याविरोधात गु.र.नं.847/2025 कलम 262 बीएनएस असा वेगळा गुन्हा दाखल झाला.

दिव्या काळे ही वाळूज भागातील शिवराई येथे लपल्याची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी विशेष पथक तयार करून इस्ट-वेस्ट कंपनीसमोरील मोकळ्या शेतातून तिला पकडले. चौकशीत तिने अश्विनी पवार, अर्चना काळे आणि सीमा जॉन्सन पवार या तिघी साथीदार महिलांची नावे सांगितली. त्यांनाही वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सर्व आरोपींना पुढील कारवाईसाठी मुंबई एमआयडीसी पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त, उपआयुक्त परिमंडळ-1 व सहाय्यक पोलीस आयुक्त छावणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, पोउनि अजय शितोळे, संदीप वाघ, पोअं. विजय पिंपळे, नितीन धुळे, श्रीकांत सपकाळ तसेच पोलीस मित्र अमन शेख व किशोर गाडेकर यांनी संयुक्तरीत्या केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: गजानन राऊत