मुंबई,५ जुलै २०२३ : मुंबईसह उपनगरात सकळापासूनच जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. याचा वाहतुकीवर परिणाम होत आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. आज मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल मुंबईत यलो अलर्ट देण्यात आला होता. दरम्यान, गेल्या २४ तासात मुंबईच्या शहरी भागात ५३.९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर पूर्व उपनगरात २७.९७ मिमी आणि पश्चिम उपनगरात ४५.६९ मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
आज मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पावसाचा ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे आज समुद्र खवळण्याची शक्यता आहे. समुद्रात आज ४.५० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा येण्याचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास समुद्रात ४.७५ मीटर उंचीच्या लाटा येण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, अद्यापही राज्यातील अनेक भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता अन्य ठिकाणी पावसाची प्रतीक्षा आहे. राज्यातील शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. पावसामुळे शेतीची कामे राखडली आहेत. दरम्यान राज्यात कोकणातील जिल्ह्यांसह मुंबई, ठाणे, परभणी, यवतमाळ या जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर