गोल पोस्ट क्रीडा क्रिकेट मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल संघावर मिळवला ५ गडी राखून विजय

मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल संघावर मिळवला ५ गडी राखून विजय

दुबई १२ ऑक्टोबर,२०२० : आयपीएल २०२० मध्ये झालेल्या सुपर संडे मधील दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल संघावर ५ गडी आणि २ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला आहे. या विजया नंतर मुंबई इंडियन्स संघ १० गुणांसह पॉइंट्स टेबल मध्ये पहिल्या स्थानी पोहोचला आहे.

सामन्यात दिल्ली कॅपिटल संघाने नाणेफेक जिंकले. आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यात सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉ याला जास्त धावा करता आल्या नाहीत. अवघ्या ४ धावा करत तो पैवेलियन मध्ये परतला. तसेच शिखर धवन याने फलंदाजीची एक बाजू सांभाळत ५२ चेंडूत ६९ धावा केल्या. आयपीएल २०२० मध्ये पहिल्यांदा स्थान मिळालेल्या अजिंक्य रहाणे याला फारशी कामगिरी करता आली नाही. तो अवघ्या १५ धावा करत माघारी परतला. कर्णधार श्रेयस अय्यर याच्या ४२ धावा आणि स्तोईनिस च्या १३ धावांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल संघाने ४ बाद १६२ धावांपर्यंत मजल मारली. मुंबई संघाकडून गोलंदाजी करताना कुणाल पांड्या याला २ विकेट्स तर ट्रेंट बोल्ट याला १ विकेट मिळाला.

१६३ धावांचा पाठलाग करताना , मुंबई इंडियन्स संघाकडून फलंदाजी करताना रोहित शर्मा हा अवघ्या ५ धावा करत माघारी परतला .एका बाजूने क्विंटन डी कॉक याने अर्धशतकिय खेळी करत ५३ धावा केल्या. याचबरोबर सूर्यकुमार यादव याने सुद्धा ५३ धावांची खेळी केली यात त्याने १ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश होता. तसेच इशान किशन याने २८,पोलार्ड याने नाबाद ११ धावा तसेच कुणाल पांड्या याने नाबाद १२ धावा करत सामना मुंबई इंडियन्स संघाला जिंकवून दिला. दिल्ली संघाकडून गोलंदाजी करतांना कगीसो रबाडा याने २ विकेट्स तर अक्षर पटेल, आर अश्विन, मार्कस स्टोइनीस यांना प्रत्येकी एक एक विकेट्स मिळाल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

error: Content is protected !!
Exit mobile version