Ahmedabad GT vs MI : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) सलामीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाची गाठ आज गुजरात टायटन्सशी पडणार आहे. त्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ सज्ज झाला आहे. शनिवारी नरेंद्र मोदी स्टेडीयमवर खेळवण्यात येणाऱ्या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्या पुनरागमन करणार असल्याने मुंबई संघाला आणखीन बळ मिळणार आहे. मागच्या हंगामात मुंबईच्या संघाने तीन वेळा षटकांची गती धीमी राखली होती, त्यामुळे हार्दिकवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. यामुळे सलामीच्या चेन्नई विरुद्धच्या सामन्यात तो खेळू शकला नव्हता. मात्र, आता गुजरात विरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या सामन्यात तो पुनरागमन करणार आहे.
गुणतालिकेत दोन्ही संघ आठव्या आणि नवव्या क्रमांकावर आहेत. मुंबईला चेन्नई विरुद्ध तर गुजरातला पंजाब किंग्जविरुद्ध मोठ्या धावसंख्येच्या सामन्यात ११ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे या हंगामातील पहिला विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघात आज काटेकी टक्कर पाहायला मिळणार असल्याने आजच्या सामन्याकडे सर्वांचे विशेष लक्ष असणार आहे. जरी आजच्या सामन्यात हार्दिक पंड्या पुनरागमन करणार असला, तरी सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्माची कामगिरी हा चिंतेचा विषय आहे. करण सलामीच्या लढतीमध्ये रोहितला खातेसुद्धा उघडता आले नव्हते.
न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर