मुंबई, दि. २८ एप्रिल २०२०: सध्या कोरोनाचे सावट सर्वत्र पसरले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये तर त्याचा प्रभाव सर्वात जास्त आहे, परंतू पुणे मुंबई यांसारखी शहरे सध्या हॉट स्पॉट आहेत. त्यातही मुंबईमध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत तसेच मृतांची संख्या ही सर्वात जास्त आहे. सामान्य माणसांचे काय तर पोलीस कर्मचारी देखील यामध्ये दगावले आहेत. अशा बिकट परिस्थितीत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर स्वतः आरोग्य सेविका म्हणून रुजू झाल्या आहेत.
किशोरी पेडणेकर या स्वतः परिचारिका आहेत. त्यामुळे वैद्यकीय सेवांशी त्या आधीपासूनच संबंधित आहेत. आपण घेतलेले हे प्रशिक्षण अशा संकटाच्या काळात उपयोगी पडावे यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याच्या काळात नायर रुग्णालयात परिचारिका म्हणून सेवा देण्यास सुरुवात केली आहे.
त्यांच्या या धाडसी कार्याचे सर्वांकडून कौतुक केले जात आहे. इतकेच नव्हे तर सुप्रिया सुळे यांनी देखील त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून त्यांच्या या कामाची प्रशंसा केली आहे. त्याचबरोबर त्यांचे आभार देखील सुप्रिया सुळे यांनी मानले आहे. “मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या स्वतः परिचारीका आहेत. त्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याच्या काळात नायर रुग्णालयात परिचारिका म्हणून सेवा बजावली. त्यांची ही कृती वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांनाच अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांचे याबद्दल मनापासून आभार.” अश्या प्रकारे त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट करून त्यांचे आभार मानले.
न्यूज अनकट प्रतिनिधी-ईश्वर वाघमारे