मुंबई, ५ ऑगस्ट २०२०: मुंबईत मुसळधार पावसानं पुन्हा एकदा कहर ओढवला आहे. दहा तासांच्या पावसामुळे सर्व भागात पाणी तुंबले. रेल्वे सेवा ठप्प झाली, महामार्ग बंद झाले, रस्ते बुडाले आणि अनेक फुटांपर्यंत घरात पाणी शिरले. मुंबई व महाराष्ट्रातील मुसळधार पावसाचा जोर कायम असून हवामान खात्याने हा विचार करता रेड अॅलर्ट जारी केला आहे.
मंगळवारी झालेल्या पावसानंतर मुंबईतील लोअर परेल भागातील टाटा मिलच्या अनेक घरांमध्ये दोन फूटांपर्यंत पूर आला. माटुंगामध्ये रस्ते आणि फुटपाथांवर गुडघ्यांपर्यंत पाणी गेले. पनवेल, भाडुप आणि प्रभादेवी रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने लोक तासन्तास अडकले होते.
मुंबईच्या कांदिवली येथे मुसळधार पावसात पश्चिमेकडील महामार्ग जोरदार भूस्खलनामुळे बंद झाला. अचानक रस्त्यावर मोठे खडक पडले. हे खडक इतके मोठे होते की जर कोणी या भूस्खलनाच्या वेळेस तेथे सापडले असते तर मोठा अपघात झाला असता. मात्र, दरड कोसळण्याच्या दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या बसेस आणि कार थोडक्यात बचावल्या.
येत्या २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता
येत्या २४ तासात मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. “मंगळवारी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे, त्यामुळे अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांची गती वाढली आहे. म्हणूनच येत्या २४ तासात मुंबई, ठाणे, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे,” अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक कृष्णकांत होसाळीकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
कोकणात मुसळधार पाऊस
कोकणात रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम दिसून येत आहे. जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. कालपासून सुरु झालेला पाऊस अद्याप थांबलेला नाही. त्यामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पुराचे पाणी शहरांत घुसल्याचे चित्र दिसून येत आहे. कोकणात ७ ऑगस्टपर्यंत तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ६ ऑगस्टपर्यंत तर विदर्भात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी