मुंबई, 20 नोव्हेंबर 2021: एज्युकेशन वर्ल्ड इंडिया या शिक्षण क्षेत्राशी निगडित संकेतस्थळाने देशभरातील सरकारी शाळांचे ऑनलाईन सर्वेक्षण करुन एक यादी जाहीर केली आहे. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूल वरळी सी फेस आणि पूनमनगर सीबीएसई शाळा यांचा देशातील अव्वल दहा सरकारी शाळांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलाय. या यशाबद्दल मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, आदी मान्यवरांनी या शाळांचे कौतुक केले आहे.
या सर्वेक्षण मध्ये सामील होण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मुंबई पब्लिक स्कूल वरळी सी फेस शाळा व मुंबई पब्लिक स्कूल पूनमनगर सीबीएसई अभ्यासक्रम शाळा अशा दोन शाश शाळांनी ऑनलाईन अर्ज सादर केले. या माध्यमातून या शाळा ‘एज्युकेशन वर्ल्ड स्कूल रँकिंग ऑफ गव्हर्नमेंट स्कूल्स इन इंडिया – सन 2021-2022(Education World School Ranking of Govt. Schools in India) या उपक्रम अंतर्गत ऑगस्ट 2021 मध्ये आयोजित सर्वेक्षणामध्ये सहभागी झाल्या होत्या. शिक्षकांचा अध्यापन दर्जा व क्षमता, शाळा इमारत, भौतिक सुविधा, अध्यापन कृती, विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी उपक्रम, सह-शालेय उपक्रम, ऑनलाईन पद्धतीने अध्यापन, मुख्याध्यापक नेतृत्व गुण, पालकांचा सहभाग या सर्व मुद्यांचा सर्वेक्षणामध्ये समावेश होता.
मुंबईतील दोन शाळा देशातील टॉप टेन शाळांमध्ये
सर्वेक्षणामध्ये दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर विविध शाळांची सखोल परिक्षण अंती निवड करण्यात आलेली आहे. त्यामध्ये मुंबई पब्लिक स्कूल वरळी सी फेस मनपा शाळेस राज्यस्तरीय प्रथम क्रमांक व राष्ट्रीय स्तरावर पाचव्या क्रमांकाने मानांकन प्राप्त झाले आहे. तसेच मुंबई पब्लिक स्कूल पूनमनगर सीबीएसई अभ्यासक्रम शाळेस राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक व राष्ट्रीय स्तरावर दहावे मानांकन प्राप्त झाले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे