मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारने ११ डिसेंबरच्या कॅबिनेट बैठकीत मुंबई नागपूर महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आता या महामार्गाचे नाव ‘हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असं करण्यात आलं आहे. मागील अनेक वर्षांपासून या महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्यावं अशी शिवसैनिकांची आग्रहाची मागणी होती.
मुंबई आणि नागपूर शहराला जोडणारा हा महामार्ग ७०१ किमी लांबीचा महामार्ग असेल. यावर आठ मार्गिका असणारा हा एक्सप्रेस वे सुमारे १० जिल्ह्यांमधून आणि ३९० गावांमधून जाणार आहे. या महामार्गासाठी ४६ हजार कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे मुंबई आणि नागपूर या शहरांमधील अंतर अवघ्या ८ तासामध्ये कापणं शक्य होणार आहे.
भारत देशातील पहिल्या मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गाची मुहूर्तमेढ बाळासाहेब ठाकरेंनी रोवली होती. त्यांच्या योगदानाचा आणि दूरदृष्टीचा यथोचित सन्मान व्हावा, यासाठी समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव देण्यात यावं अशी संपूर्ण महाराष्ट्रातील शिव सैनिकांची मागणी होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये समृद्धी महामार्गाला अटलबिहारी वाजपेयी याचं नाव देण्याचा घाट घातला होता. त्यावरून तत्कालीन सत्तेमध्ये असणार्या शिवसेना आणि भाजपामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. आता या महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंच नाव मिळाल्याने शिवसैनिक आणि महाराष्ट्रीयन जनता उत्साही असल्याचे शिव सैनिकांनी सांगितले आहे.