मुंबई, १५ जुलै २०२३ : मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दोन लाख रुपयांची लाच घेताना पोलीस निरीक्षक आणि एका हवालदाराला अटक केली आहे. याबाबत माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितले की, मुलुंड पोलिस ठाण्यात तैनात असलेल्या दोन्ही आरोपींना शुक्रवारी अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक भूषण मुकुंदलाल दायमा (वय ४०) आणि हवालदार रमेश मछिंद्र बतकळस(वय ४६) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
एसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिस निरीक्षक आणि हवालदार यांनी ज्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला, त्यांच्याकडून २५ लाख रुपयांची मागणी केली. दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला धमकी दिली की, जर त्याने पैसे दिले नाहीत तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, दोन्ही पोलिस नंतर ११ लाख रुपये घेण्यास तयार झाले. त्यांच्या मागणीला कंटाळून तक्रारदाराने गेल्या आठवड्यात एसीबीकडे धाव घेतली. त्याच्या तक्रारीवरून कारवाई करत एसीबीने सापळा रचून दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना दोन पोलिसांना पकडले. आरोपी पोलिसांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड