नाशिक, २५ ऑक्टोंबर २०२३ : मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये मोठी कारवाई केली आहे. ललित पाटील याच्या अटकेनंतर मुंबई पोलिस आता नाशिकमध्ये कारवाईच्या मार्गावर आहेत. या अंतर्गत मुंबई पोलिसांनी आता नाशिकच्या ग्रामीण भागात शोधमोहीम सुरू केलीय. सध्या गिरणा नदीच्या पात्रात पोलिसांना करोडो रुपयांचे ड्रग्ज सापडले आहे. नदीपात्रातून ड्रग्ज बाहेर काढून त्याची तपासणी करण्यात आली.
ललित पाटील याचा चालक सचिन वाघ याच्या चौकशीत ही माहिती समोर आली. यानंतर मंगळवारी रात्री २ वाजता मुंबई पोलिसांच्या पथकाने अंडरवॉटर कॅमेऱ्यांच्या मदतीने नदीत ड्रग्जचा शोध घेतला आणि या झडतीमध्ये कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. सुमारे १५ फूट खोल पाण्यात ड्रग्सचा साठा सापडला.
रात्रीच्या अंधारात स्कुबा चालकांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. रात्रीच्या अंधारात पाण्यातून ड्रग्जचा हा साठा बाहेर काढणे अवघड होते, त्यामुळे सकाळी ड्रग्जचा साठा सुमारे १५ फूट खोलीतून बाहेर काढण्यात आला. नाशिकमध्ये पोलिस अशा अनेक ड्रग्ज माफियांना लवकरच बेड्या ठोकण्याची शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड