जानेवारीत येणा-या कोरोनाच्या दुस-या लाटेला मुंबईची तयारी

मुंबई, १९ नोव्हेंबर २०२० : मुंबई महापालिका क्षेत्रातील ‘कोविड – १९’ बाधित रुग्णांचे प्रमाण दुप्पट होण्याच्या सरासरी कालावधीने आता त्रिशतक गाठलं आहे. महानगरपालिका क्षेत्रातील रुग्ण वाढीचा सरासरी दर हा आता आणखी घसरुन ०.२२ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. सक्रीय रुग्णांच्या संख्येत सुद्धा सातत्याने घट होत असून ही संख्या आज ११,५५७ इतकी झाली आहे.

सक्रीय रुग्णांची संख्या आणि रुग्ण वाढीचा दर हा सातत्यानं कमी होत असला, तरीदेखील सध्या चर्चात्मक पातळीवर असलेल्या कोविडच्या दुस-या लाटेची संभाव्यता लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येत असलेल्या कोविड विषयक सोयी-सुविधांमध्ये कोणतीही कपात केलेली नाही.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्यानं कमी होत असली, तरीही बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानं आपल्या स्तरावरील सातत्यापूर्ण कार्यवाहीमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता येऊ दिलेली नाही. महापालिका क्षेत्रातील नागरिकांशी तुलनेनं अधिक संपर्क येणा-या व्यवसायिकांची कोविड विषयक वैद्यकीय चाचणी करुन घेण्यासाठी महापालिकेनं विशेष मोहीम सुरु केली आहे.

या अंतर्गत विविध दुकानदार, दुकानात – हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी, बेस्टचे चालक – वाहक यांची कोविड विषयक चाचणी नियमितपणे करण्यात येत आहे. या चाचणी दरम्यान बाधित रुग्ण आढळून आल्यास त्यांच्यावर आवश्यक ते वैद्यकीय औषधोपचार करण्यासोबतच त्यांचं विलगीकरण करणं, समुपदेशन करणं इत्यादी कार्यवाही देखील करण्यात येत आहे. नागरिकांना कोविडची कोणतीही लक्षणे जाणवल्यास त्यांनी तातडीने कोविड विषयक वैद्यकीय चाचणी करवून घ्यावी.

यासाठी महापालिकेच्या अखत्यारितील विविध दवाखाने, रुग्णालयं अशा २४४ ठिकाणी मोफत वैद्यकीय चाचणी सुविधा उपलब्ध आहे. सध्या कोविड बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १७ हजार ४६७ खाटांची व्यवस्था असून यापैकी १२ हजार ५२९ खाटा या रिक्त आहेत. मात्र, असं असलं तरीही, कोविड बाधित रुग्णांसाठी आवश्यक असणारा प्राणवायू पुरवठा, अतिदक्षता खाटा, व्हेन्टीलेटर इत्यादींची व्यवस्था पुरेशा प्रमाणात करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा